गायक आनंद शिंदे यांचे धाकटे बंधू गायक दिनकर प्रल्हाद शिंदे यांचे निधन झाले आहे. त्यांचा पुतण्या, गायक उत्कर्ष शिंदे याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित ही माहिती दिली आहे.गायक दिनकर प्रल्हाद शिंदे यांच्या निधनाने शिंदे कुटुंबावर आणि मराठी संगीतविश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दिनकर शिंदे हे आंबेडकरी चळवळीतले एक प्रभावी गायक होते, ज्यांनी आपल्या आवाजातून सामाजिक संदेश देणारी गीते लोकांपर्यंत पोहोचवली.
उत्कर्ष शिंदे यांनी आपल्या काकांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. प्रल्हाद शिंदे यांच्या गायकीचा वारसा पुढे नेण्यात आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, आणि दिनकर शिंदे यांनी मोलाची भूमिका बजावली. दिनकर शिंदे यांनी विशेषतः आंबेडकरी गीते आणि लोकगीतांच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांची मने जिंकली. त्यांच्या गाण्यांनी महाराष्ट्रातील अनेक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यूट्यूबवर त्यांच्या गायनाला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत, आणि त्यांची गाणी आजही लोकांच्या मनात घर करून आहेत.
उत्कर्ष शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “शिंदे घराण्याने नाती, माणसे, मित्रपरिवार, आणि प्रेक्षकवर्ग यांचा मोठा ठेवा कमावला आहे. मागच्या वर्षी आपल्या सार्थकला गमावण्याचे दुःख तुम्हाला सहन करावे लागले, आणि आता तुम्ही आम्हाला सोडून गेलात.” त्यांनी पुढे असेही म्हटले की, “शिंदे घराण्याचा वटवृक्ष आणखी भव्य आणि समृद्ध करण्यासाठी आम्ही एकत्र राहून काम करत राहू.” दिनकर शिंदे यांच्या निधनाने मराठी संगीतविश्वाला एक मोठी हानी झाली आहे, आणि त्यांच्या आवाजाची उणीव सदैव जाणवत राहील.