Suresh Gopi : अभिनेने आणि मंत्री सुरेश गोपी यांच्या एका वक्तव्यावरून सर्वत्र खळबळ उडाली आहे. गोपी यांनी मला मंत्रिपदावरून हटवा असे आवाहन मोदी सरकारला केले आहे, माझी चित्रपटात आवड असून मी अभिनयाशिवाय राहू शकत नाही, असे त्यांनी म्हंटले आहे. केरळमधील भाजपचे एकमेव लोकसभा सदस्य सुरेश गोपी हे मोदी सरकारमध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि पर्यटन खात्याचे राज्यमंत्री आहेत.
सुरेश गोपींचे हे विधान पहिल्यांदाच आलेले नाही. यापूर्वीही त्यांना मंत्री बनवल्यानंतर लगेचच त्यांना मंत्रीपद भूषवायचे नसल्याची बातमी आली होती. अशातच आता मला राज्यमंत्रिपदावरून काढून टाकले तर मला खूप आनंद होईल. असे त्यांनी म्हंटले आहे.
यावेळी ते म्हणाले, “मला मंत्री व्हायचे नव्हते आणि आताही बनायचे नाही, मला मंत्री बनवण्याच्या त्यांच्या (मोदींच्या) निर्णयापुढे मी नतमस्तक झालो, कारण त्यांनी मला हे पद माझ्यासाठी नव्हे, तर त्रिशूरच्या जनतेसाठी दिले आहे. म्हणून मी हा निर्णय मान्य केला. मी आजही माझ्या नेत्यांची आज्ञा पाळतो आणि यापुढेही करत राहीन. पण माझ्या आवडीशिवाय (सिनेमा) मी जगू शकत नाही, मी चित्रपट केला नाही तर मी मरून जाईल असे त्यांनी म्हंटले आहे.
गोपी यांनी असा आक्षेप घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाल्यानंतर लगेचच गोपी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते, ‘मला खासदार म्हणून काम करायचे आहे. मला मंत्रिमंडळात स्थान नको. मला वाटले की, मला लवकरच पदावरून मुक्त केले जाईल. पण असे झाले नाही. त्रिशूरचे लोक मला चांगले जाणतात. मी खासदार म्हणून चांगली कामगिरी करेन. मला चित्रपटांमध्ये अभिनय करायचा आहे. त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही. असे म्हंटले होते.