Kangana Ranaut : अभिनेत्री आणि खासदार, कंगना रणौत तिच्या वादग्रस वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. ती अनेकवेळा काँग्रेस आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधताना दिसली आहे. विरोधकांवर हल्लाबोल करणाऱ्या कंगना राणौतने आता शेतकरी आंदोलनावर निशाणा साधला आहे.
एका प्रसिद्ध टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत कंगना राणौतने शेतकरी आंदोलनाबाबत मोठे वक्तव्य केले आहे, यावेळी कंगना म्हणाली, “शेतकऱ्यांच्या आंदोलनात अनैतिक हिंसाचार झाला. तेथे बलात्कार आणि हत्याही झाल्या. केंद्र सरकारने शेतीची बिले मागे घेतली नाहीतर या लोकांचे मोठे नियोजन होते. हे देशात काहीही करू शकतात.”
पुढे कंगना म्हणाली, “जर आमचे सर्वोच्च नेतृत्व मजबूत नसते तर या लोकांनी पंजाबचे बांगलादेश बनवले असते. शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली जे काही चालले होते ते देशापासून लपलेले नाही. आंदोलनादरम्यान माणसे मारली जात होती, मृतदेहांना लटकवले जात होते. सरकारने कृषी विधेयक मागे घेताच या साऱ्यांना धक्का बसला.”
कोलकाता बलात्कारावर देखील केले वक्तव्य
या मुलाखतीदरम्यान कोलकाता प्रकरणावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कंगना म्हणाली, “महिलांची सुरक्षा हा माझ्यासाठी नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. मी महिलांच्या सुरक्षेबाबत खूप गंभीर आहे आणि महिलांच्या समर्थनार्थ आवाज उठवत आहे. मी आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या शोमध्ये आयटम नंबरलाही विरोध केला होता.”
काँग्रेसने केले कारवाईची मागणी
कंगना राणौतच्या त्या मुलाखतीवर आता काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. पंजाब काँग्रेसचे नेते राजकुमार वेरका यांनी कंगना राणौतवर एनएसए लागू करण्याची मागणी केली आहे. वेरका म्हणाले, ‘कंगना अनेकदा अशी विधाने करते आणि आता तिने शेतकऱ्यांना शिवीगाळ केली आहे. या आरोपांवर भारतीय जनता पक्षाने स्पष्टीकरण द्यावे. मी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना आवाहन करतो की कंगनाच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात यावा.”