सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर अवघ्या 8 महिन्यांतच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली. यानंतर सर्व क्षेत्रातून या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. आठ महिन्यांपूर्वी नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. परंतु अवघ्या आठ महिन्यातच हा पुतळा कोसळल्याने बांधकामाच्या दर्जाचा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे.
या घटनेवरून राजकीय वातावरण तापलेले दिसून येत आहे एकमेकांवर जोरदार टीका देखील सुरू आहे मनोरंजन क्षेत्रातील अनेक व्यक्तींकडून देखील या घटनेवर प्रतिक्रिया येत आहेत. लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख याने देखील यावरती भाष्य केले आहे.
याबाबत रितेश देशमुख याने ट्विटरवर ट्विट केले आहे. अवघ्या तीन शब्दांतच या घटनेवर अभिनेता रितेश देशमुख याने प्रतिक्रिया दिली आहे. राजे माफ करा असे तीन शब्दांचे ट्विट त्याने केले आहे. ही पोस्ट करताना #छत्रपति_शिवाजी_महाराज हा हॅशटॅग त्याने वापरला आहे.
रितेशच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनाही प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रत्येकाच्या मनातलं रितेश बोलला, असे एका नेटकऱ्याने म्हंटले आहे.
नौदलाने देखील या घटनेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. घटनास्थळी जाऊन या घटनेचा तपास करत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. लवकरात लवकर पुतळा दुरुस्त करण्यासाठी एका पथकाची नियुक्ती करणार असल्याचे देखील नौदलाकडून सांगण्यात येत आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोकणातल्या किनारपट्टी भागात वादळी वारे आणि मुसळधार पाऊस सुरू असताना राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पूर्णाकृती पुतळा कोसळला आहे. यावरून शिवप्रेमीही व्यथित झाले आहेत.