Kangana Ranaut : भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतचा आगामी चित्रपट ‘Emergency’ रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटावर शिरोमणि गुरुद्वारा व्यवस्थापन समिती नाराज असल्याचे दिसत आहे. गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने कंगना रनौत आणि चित्रपट निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटिशीत चित्रपटातील शिख समुदाय चुकीच्या पद्धतीने दाखवणारे सीन हटवण्यास सांगण्यात आले आहे.
याआधी पंजाब आणि हरियाणा कोर्टात या सिनेमाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या चित्रपटात शीख धर्मीयांना चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आल्याने पंजाबमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती द्यावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
‘Emergency’ चित्रपटाचा वाद काय?
शिरोमणि गुरुद्वारा व्यवस्थापन समितीसह अनेक संघटना या चित्रपटाच्या रिलीजच्या विरोधात आहेत. हा चित्रपट ‘शीख विरोधी’ कथेचा प्रचार करत असून शीख समाजाला चुकीच्या पद्धतीने दाखवत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित करू नये किंवा त्यातून आक्षेपार्ह दृश्ये हटविण्यात यावीत. अशी मागणी होत आहे.
अभिनेत्रीला धमक्या
हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच कंगना राणौतला सोशल मीडियावरून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. याची माहिती स्वतः कंगनाने हिमाचल आणि पंजाब पोलिसांना दिली होती. कंगनाने तिच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये काही लोक ‘Emergency’ चित्रपटाच्या रिलीजवर धमकी देत आहेत.