Netflix web series : नेटफ्लिक्सच्या IC814-द कंदहार हायजॅक या वेबसिरीजवर बंदी घालण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे. सुरजीत सिंह यादव यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत म्हटले आहे की, दहशतवाद्यांना हिंदू असे नाव देऊन त्यांची खरी ओळख चुकीची दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात 1999 च्या घटनेत सहभागी असलेल्या दहशतवाद्यांची खरी ओळख लपवून ठेवली असल्याचे म्हंटले आहे.
“IC814- The Kandahar Hijack” ही वेब सीरिज 24 डिसेंबर 1999 रोजी इंडियन एअरलाइन्सच्या विमानाच्या अपहरणाच्या घटनेवर आधारित आहे. या विमानात 154 प्रवासी आणि क्रू मेंबर्स प्रवास करत होते. हे विमान काठमांडूहून दिल्लीला येणार होते पण विमानाने उड्डाण करताच 40 मिनिटांत दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण केले. ज्या दहशतवाद्यांनी हे अपहरण केले ते पाकिस्तानस्थित हरकत-उल-मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. हे विमान त्यावेळी तालिबानच्या ताब्यात असलेल्या अफगाणिस्तानमधील कंदाहारच्या दिशेने वळवण्यात आले होते.
विमान अपहरणानंतर आठ दिवस चाललेल्या घटनेदरम्यान दहशतवाद्यांनी मौलाना मसूद अझहर, अहमद उमर सईद शेख आणि मुश्ताक अहमद जरगर यांच्या सुटकेची मागणी केली. अपहरण झालेल्या प्रवाशांच्या जीवाची सुरक्षा आणि प्रचंड दबाव लक्षात घेऊन तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी सरकारने दहशतवाद्यांची सुटका करण्याचे मान्य केले होते. दहशतवाद्यांची सुटका करण्यासाठी तत्कालीन परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह स्वतः कंदहारला गेले होते.
“IC814- The Kandahar Hijack” ही वेब सिरीज अनुभव सिन्हा यांनी दिग्दर्शित केली आहे, जी 29 ऑगस्ट रोजी Netflix वर प्रदर्शित झाली. विजय वर्मा, नसिरुद्दीन शाह, पंकज कपूर आणि इतर कलाकारांनी वेब सीरिजमध्ये काम केले आहे. या वेब सिरीजमध्ये दहशतवाद्यांबाबत तथ्यांचा विपर्यास केल्याचा आरोप आहे. शंकर आणि भोला अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. या नावांवर आक्षेप घेत इस्लामिक अतिरेकी गटांशी संबंधित असलेल्या दहशतवाद्यांची खरी ओळख लपवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यासंदर्भात X वर बॉयकॉट नेटफ्लिक्स या हॅशटॅगसह मोहीम चालवली जात आहे.
याप्रकरणी केंद्र सरकराने बैठक घेत, नेटफ्लिक्सच्या कटेंट हेडना या वेबसीरीजमधील अतिरेक्यांच्या नावाबाबत प्रश्न विचारले गेले. जेव्हा हिंदू नावाचा उल्लेख होतो, तेव्हा खाली सबटायटल किंवा कॅप्शनमध्ये अतिरेक्यांची खरी नावेही द्यायला हवी होती, असे सरकारकडून सांगण्यात आले. तसेच वेबसीरीजमध्ये अपहरणकर्ते अतिरेकी ठाण आणि संवेदनशील वाटत आहेत. तर त्यांच्याशी तडजोडीची चर्चा करणारे अधिकारी फारच दुबळे आणि संभ्रमित असलेले दिसत आहेत, असा आक्षेप सरकारने घेतला होता.
यावर नेटफ्लिक्सने उत्तर दिले की, भविष्यात सादर होणाऱ्या कलाकृतींबाबत काळजी घेतली जाईल, तसेच राष्ट्राच्या भावनांचा आदर केला जाईल. केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याबरोबर झालेल्या बैठकीत नेटफ्लिक्सच्या भारतातील कटेंट हेड मोनिका शेरगिल यांनी आगामी काळात कलाकृतींबाबत अधिक काळजी घेऊ असे आश्वासन दिले आहे.”