Kangana Ranaut : अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या खासदार कंगणा राणौत नेहमीच काही न काही वक्तव्य करत असतात. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्या नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. अशातच पुन्हा एकदा त्यांचे एक वक्तव्य त्यांच्या अडचणी वाढवताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी शेतकरी आंदोलणविषयी एक वक्तव्य केले होते त्यामुळे सध्या त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. तसेच कारवाईची मागणी केली जात आहे.
कंगना यांनी काहीदिवसांपूर्वी शेतकरी आंदोलना दरम्यान हत्या आणि बलात्काराच्या घटना घडल्या असल्याचे वक्तव्य केले होते. यावरूनच त्यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत या वक्तव्यामुळे त्यांच्या अटकेची मागणी जोर धरून आहे.
कंगणा राणौत आंदोलणाविषयी बोलताना म्हणाल्या होत्या की, “केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे मागे घेतले ते चांगले झाले. कायदे मागे घेतल्यानंतर आंदोलकांना धक्का बसला. शेतकरी आंदोलनावेळी देशाचे नेतृत्व मजबूत नसतं, तर या लोकांनी पंजाबमध्ये बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण केली असती. शेतकरी आंदोलनाच्या नावावर जे काही सुरु होत, ते सर्वांनी बघितले आहे.”
त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेक शेतकरी संघटनांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. दरम्यान, भारतीय किसान युनियन क्रांतीचे राष्ट्रीय अध्यक्ष विपीन मलिक यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या अटकेसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर घेऊन पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला. या आंदोलनात शेतकऱ्यांनी कंगना यांच्या विरुद्ध घोषणाबाजी केली तसेच त्यांच्या अटकेची मागणी केली.
यावेळी कंगना राणौतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी देखील शेतकऱ्यांकडून केली गेली. तसेच कंगनाने त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी देखील मागावी. असे त्यांचे म्हणणे आहे
कंगना राणौतवर गुन्हा दाखल झाल्यावरच आज घरी जाईन, अन्यथा ट्रॅक्टर ट्रॉलीही पोलिस ठाण्यात आणि बाहेर उभी केली जाईल तसेच शेतकरी देखील पोलिस ठाण्यातच थांबतील असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, कंगना राणौतवर मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला असून तुमचे तक्रार पत्रही तेथे पाठवले जाईल असे आश्वासन सीओ दौराला शुचिता सिंह यांच्याकडून शेतकऱ्यांना मिळाले यामुळेच आता शेतकरी ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन परत गेले आहेत.