Aamir Khan : प्रसिद्ध अभिनेता आमिर खान याने आज अकोल्याच्या डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला भेट दिली. येथे शेतकऱ्यांसाठी शिवारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. शिवारफेरीच्या दुसऱ्या दिवशी आमिर खान याने कृषी विद्यापीठाच्या संशोधन कार्याची बारकाईने पाहणी केली आणि संबंधित विभागाकडून माहिती घेतली.
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना प्रगत शेतीची माहिती देणे आणि त्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती करून देणे हा होता. आमिर खानच्या आगमनामुळे हा कार्यक्रम आणखीनच खास ठरला. त्यांनी विविध संशोधन प्रकल्प, प्रगत शेती तंत्र आणि कृषी संबंधित नवकल्पनांचे कौतुक केले.
यावेळी आमिर खानने शेतकऱ्यांशी देखील संवाद साधला आणि त्यांचे अनुभव जाणून घेतले. शेती हा आपल्या देशाचा कणा असून शेतकऱ्यांना सक्षम बनवणे हे सर्वात महत्त्वाचे काम असल्याचे अभिनेत्याने यावेळी म्हंटले. आमिर खानच्या उपस्थितीने शेतकऱ्यांना प्रोत्साहन तर मिळालेच शिवाय कृषी विद्यापीठाच्या कामालाही नवी ओळख मिळाली.
आमिर खानची कृषी विद्यापीठाला भेट आणि त्याने घेतलेल्या पुढाकारामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या वेळी अभिनेत्याने शेतकऱ्यांना सांगितले की, ‘शेतीमध्ये नवनवीन प्रयोग आणि तंत्र अवलंबूनच आपण शेती अधिक प्रगत करू शकतो.’ कार्यक्रमादरम्यान आमिर खानच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि कार्यक्रम संस्मरणीय बनवला. यावेळी अमीर खानने आपल्या “पाणी फाऊंडेशन”चा देखील प्रचार केला.