Laapataa Ladies : किरण राव यांच्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटाची ऑस्कर पुरस्कार 2025 साठी निवड झाली आहे. ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’ने सोमवारी ही घोषणा केली आहे. यासोबतच किरण राव यांचे स्वप्नही पूर्ण झाले आहे.
तुमच्या माहितीसाठी, किरण रावच्या या हिंदी चित्रपटाची निवड 29 चित्रपटांमधून करण्यात आली आहे ज्यात बॉलिवूडचा हिट चित्रपट ‘ॲनिमल’, मल्याळमचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘अट्टम’ आणि कान्स फिल्म फेस्टिव्हल विजेता ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’ यांचा समावेश आहे.
आसामी चित्रपट दिग्दर्शक जाह्नू बरुआ यांच्या नेतृत्वाखालील 13 सदस्यीय निवड समितीने अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट श्रेणीसाठी आमिर खान आणि किरण राव निर्मित ‘लापता लेडीज’ची एकमताने निवड केली आहे.
तमिळ चित्रपट ‘महाराजा’, तेलगू चित्रपट ‘कल्की 2898 एडी’ आणि ‘हनु-मान’ तसेच ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ आणि ‘आर्टिकल 370’ हे हिंदी चित्रपटही या शर्यतीत होते.
‘लापता लेडीज’ या चित्रपटात प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव आणि नितांशी गोयल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर या चित्रपटात रवी किशन आणि छाया कदम यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
‘लपता लेडीज’ हा चित्रपट 1 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र बॉक्स ऑफिसवर त्याची सुरुवात संथ गतीने झाली होती. मात्र भन्नाट स्टोरीमुळे या चित्रपटाने वेग पकडला आणि बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला.
या चित्रपटाची सुरुवात फक्त 75 लाख रुपयांनी झाली. मात्र, ओपनिंग वीकेंडपर्यंत चित्रपटाने 4 कोटींची कमाई केली. ‘लापता लेडीज’चे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 17.31 कोटी रुपये आहे. या चित्रपटासंबंधित नुकतेच किरण रावने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘लपता लेडीज ऑस्करपर्यंत पोहोचले तर माझे स्वप्न पूर्ण होईल. अशा स्थितीत आता किरण राव चे हे स्वप्न सत्यात उतरल्याचे दिसत आहे.