तिरुपती (Tirupati ) मंदिरात दिल्या जाणाऱ्या लाडूच्या प्रसादावरून वाद विवाद सुरू आहेत. प्रसादाच्या लाडूसाठी वापरलेल्या तुपात माशांचे तेल आणि प्राण्यांच्या चरबीचा वापर केला असल्याचा आरोप करण्यात आला त्यानंतर या प्रकरणावरून अनेक चर्चा सुरू झाल्या. आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण (Pawan Kalyan) यांनी या प्रकरणावरून अभिनेता कार्तीवर हल्लाबोल केला आहे.
अभिनेता कार्ती हैदराबादमधील एका कार्यक्रमात उपस्थित असताना त्याठिकाणी एका अँकरने लाडू विषयी एक मिम्स सादर केला होता. यावर अभिनेता कार्तीने ‘ हे सर्व काय आहे,आम्हाला लाडू विषयी काहीच बोलायचे नाही आम्ही लाडू विषयी काही बोलू इच्छित नाही अशी प्रतिक्रिया दिली होती. यानंतर सादर केलेल्या मिम्सवर कार्ती जोरात हसू लागतो आणि त्याच्यासोबत तिथे उपस्थित सर्वजण हसू लागतात. या प्रकरणावरूनच पवन कल्याण यांनी नाराजी दाखवली आहे. यानंतर आता कार्तीने सोशल मीडियाद्वारे पवन कल्याण यांची जाहीर माफी मागितलेली आहे.
काल (24 सप्टेंबर ) रोजी विजयवाडामध्ये पवन कल्याण यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले आहेत की, “चित्रपट इंडस्ट्रीमधील लोक तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या प्रकरणावर चर्चा करत असतील तर त्यांनी या प्रकरणावर आदरपूर्वक बोलावे किंवा कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये. तसेच हा विषय बऱ्याच लोकांसाठी अत्यंत वेदनादायी आहे आणि तुम्ही त्याच विषयाची गंमत करत आहात.” सार्वजनिकपणे या प्रकरणावर प्रतिक्रिया देणे सर्वांनी टाळावे असे खडेबोल पवन कल्याण यांनी सुनावलेले आहेत.
यानंतर कार्तीने पवन कल्याण यांची जाहीर माफी मागितली आहे. “मीसुद्धा भगवान व्यंकटेश्वर यांचा भक्त आहे. मला आपल्या परंपरा नेहमीच प्रिय आहेत. तसेच पवन कल्याण सर, तुमच्याबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. माझ्या वागण्यावरून अनपेक्षित गैरसमज निर्माण झाल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो असे विधान माफी मागताना कार्तीने केले आहे.
दरम्यान, कार्तीने मागितलेल्या जाहीर माफीचा स्वीकार पवन कल्याण यांनी केला आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट केले आहे. ‘एक सेलिब्रिटी म्हणून आपली संस्कृती आणि अध्यात्मिक मूल्ये याबद्दलची एकता आणि आदर वाढवणे ही आपली जबाबदारी असते. सिनेमाच्या माध्यमातून सतत प्रेरणा देत राहून ही मूल्ये जपण्याचा आपण प्रयत्न करावा असे पवन कल्याण म्हणाले आहेत.