भारतीय सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने (CDSCO) नुकताच औषधांसंदर्भात एक अहवाल सादर केला आहे. या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार एकूण ५३ औषधे गुणवत्ता चाचणीत फेल ठरलेली आहेत. यामध्ये प्रत्येक घरातील रुग्णांकडे असणारे पॅरासिटामॉल (500 मिग्रॅम) हे औषध देखील गुणवत्ता चाचणीत फेल झाल्याची माहिती समोर आली आहे.
प्रत्येक महिन्याला भारतीय सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनकडून औषध चाचणीसाठी काही औषधे निवडली जातात. यावर्षी ऑगस्ट महिन्यात करण्यात आलेल्या चाचणीसाठी व्हिटॅमिन सी आणि डी 3 गोळ्या शेलकल, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी सॉफ्टजेल, अँटासिड पॅन-डी, पॅरासिटामॉल आयपी 500 मिलीग्राम, मधुमेहावरील औषध ग्लिमेपिराइड, उच्च रक्तदाबावरील औषध टेलमिसार्टन ही औषधे चाचणीसाठी सरकारी संस्थेने निवडली होती. परंतु आता ही औषधे गुणवत्ता यादीत अयशस्वी ठरलेली आहेत. या औषधांसह एकूण ५३ औषधे गुणवत्ता यादीत फेल झाली आहेत.
हेटेरो ड्रग्ज, अल्केम लॅबोरेटरीज, हिंदुस्तान अँटिबायोटिक्स लिमिटेड (एचएएल), कर्नाटक अँटिबायोटिक्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड, मेग लाइफसायन्स, प्युअर अँड क्युअर हेल्थकेअर या नामांकित कंपन्यांनी ही औषधे तयार केलेली आहेत. दरम्यान, औषधांच्या उत्पादनाची तारीख, कालबाह्यता तारीख, बॅच क्रमांक, उत्पादनाचे नाव इत्यादी माहिती देखील भारतीय सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने सादर केलेल्या अहवालात दिलेली आहे.