आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Elections 2024) पार्श्वभूमीवर सरकारकडून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सध्या देशभरात कांद्याचे भाव दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा होत आहे. परंतु वाढत चाललेल्या कांद्याच्या दरांचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे. यामुळेच आता देशातील काही शहरांमध्ये सरकारकडून 35 रुपये किलो दराने कांद्याची विक्री होत आहे. देशाच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने 35 रुपये प्रति किलो दराने कांदा विक्री करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
दिल्ली-एनसीआर ते चेन्नई, जयपूर, रांची, कोलकाता या ठिकाणी ३५ रुपये किलोने कांदा मिळणार असून त्यासाठी मोबाईल व्हॅन तैनात करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची माहिती ट्विटकरून सरकारकडून देण्यात आली आहे. कांद्याच्या वाढत्या दरापासून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.भारतात कांद्याचे दर वाढत चालले आहेत तर अफगानिस्तानमध्ये कांद्याचे दर घसरले आहेत. यामुळेच भारतात अफगाणिस्तानचा लाल कांदा आयात करण्यास सरकारने सुरुवात केलेली आहे. परंतु सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक शेतकरी संघटना आक्रमक झालेल्या आहेत.
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी मोठे वक्तव्य केले आहे. अफगाणिस्तानमधून करण्यात येणारी कांद्याची आयात थांबवली गेली नाही तर नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात मंत्र्यांच्या गाड्यांवर कांदाफेक करू असा इशाराच त्यांनी दिलेला आहे.