जम्मू-काश्मीरच्या(Jammu and Kashmir) कुलगाम जिल्ह्यात (Kulgam) सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याची माहिती काश्मीर झोन पोलिसांनी आज सकाळी दिली आहे. कुलगाम जिल्ह्यातील आदिगाम देवसर भागात ही चकमक सुरू झाली आहे असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. या चकमकीत लष्कराचे तीन जवान आणि एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. जखमी झालेल्या जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळालेली आहे. काश्मीर झोन पोलिसांनी याबाबत X वर पोस्ट केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी कुलगामच्या आदिगाम देवसर भागात चकमक सुरू झाली आहे असे सांगितले आहे.
यापूर्वी 22 सप्टेंबर रोजी किश्तवाड जिल्ह्यातील चतरू भागात सुरक्षा कर्मचारी आणि दहशतवाद्यांमध्ये अशीच चकमक झाली होती. आता भारतीय लष्कराने आज कुलगामच्या अरिगाम येथे संयुक्त कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. काश्मीरमधील कुलगाममधील आदिगाम देवसर भागात दोन-तीन दहशतवादी लपून बसल्याची शक्यता होती. यामुळेच सुरक्षा दलांनी आदिगाममध्ये शोधमोहीम राबवली होती आणि ही शोध मोहीम सुरू असतानाच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यामुळे सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली.
दरम्यान, पुलवामाच्या अवंतीपोरामध्ये पोलिसांनी दहशतवाद्यांना अटक केली आहे. पाकिस्तानमधील जैश-ए-मुहम्मद या जिहादी इस्लामिक दहशतवादी संघटनेच्या ६ दहशतवाद्यांना पकडण्यास पोलिसांना यश आले आहे. ५ आयईडी, ३० डेटोनेटर, आयईडीच्या १७ बॅटरी, २ पिस्तूल, ३ मॅगझिन, २५ राउंड, ४ हँड ग्रेनेड आणि २० हजार रुपये देखील पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केलेले आहेत.