भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड (Dhananjaya Yeshwant Chandrachud) यांनी वकिलाने न्यायालयात अनौपचारिक भाषा वापरल्याबद्दल त्याला जोरदार फटकारलेले आहे. ‘Yeah’ असा शब्द वापरल्याबद्दल नाराज होत, त्यांनी वकिलाला स्पष्ट सांगितले आहे की, कोर्टरूम हे कॅफे नाही, येथे गंभीरता असायला हवी. या वकिलाने कोर्टात माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या विरोधात अंतर्गत चौकशीची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. यावर, “ही कलम 32 ची याचिका आहे का? तुम्ही न्यायाधीशांवर जनहित याचिका कशी दाखल करू शकता?” सरन्यायाधीशांनी असे प्रश्न उपस्थित केले आहेत.
सरन्यायाधीशांच्या या प्रश्नावर वकिलाने उत्तर दिले आहे की, गोगोई यांनी त्याच्या याचिकेवर “बेकायदेशीर” असल्याचे भाष्य केले होते.हे सांगताना या वकिलाने “हो, हो (Yeah, Yeah) तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी मला क्युरेटिव्ह दाखल करण्यास सांगितले होते. ” असे वक्तव्य केले होते. यावर सरन्यायाधीशांनी या वकिलाला सांगितले आहे की, उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देताना न्यायाधीशांना दोष देणे योग्य नाही. तसेच न्यायालयाच्या कार्यपद्धतीत अशा अनौपचारिक भाषेचा वापर सहन केला जाणार नाही असे देखील सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणालेले आहेत.
तसेच “न्यायमूर्ती गोगोई हे या न्यायालयाचे माजी न्यायाधीश होते. तुम्ही न्यायमूर्तींविरुद्ध अशी याचिका दाखल करू शकत नाही आणि खंडपीठासमोर तुम्ही यशस्वी झाला नाही म्हणून अंतर्गत चौकशीची मागणी देखील करू शकत नाही,” असे सरन्यायाधीशांकडून त्या वकिलाला सांगण्यात आलेले आहे. यावेळी वकिलाने आपली बाजू मांडताना म्हटले आहे की, मी CJI ठाकूर यांना माझी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास सांगितली होती परंतु ती याचिका फेटाळण्यात आली आहे.
दरम्यान, आता या सर्व प्रकरणावरून न्यायालयाने कोर्टात असलेल्या सर्व उपस्थितांना या घटनेवरुन एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. न्यायालय हे गंभीर कामाचे ठिकाण आहे,आणि इथे अनौपचारिक भाषा वापरू नये असे न्यायालयाकडून सांगण्यात आलेले आहे.