आगामी विधानसभा निवडणूका (Vidhansabha Elections 2024 ) तोंडावर आल्या असताना राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहेत. सर्व पक्ष आगामी निवडणूकीची जोरदार तयारी करताना दिसून येत आहे. पक्षांच्या जागावाटपावरून बैठक देखील सुरू आहेत. काही पक्षांकडून उमेदवारांच्या नावाच्या घोषणा देखील करण्यात आल्या आहेत. महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत विधानसभा निवडणुकीत होणार असतानाच आता भारत निवडणूक आयोगाकडून नवीन पक्षाला मान्यता देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीराजे भोसले (Sambhaji Raje) यांच्या पक्षाला निवडणूक आयोगाने मान्यता दिली असून हा पक्ष आता ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ या नावाने निवडणुकीत उतरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
“सप्तकिरणांसह पेनाची निब” हे निवडणूक चिन्ह महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला देण्यात आले असल्याची माहिती छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी फेसबूकवर याबाबत पोस्ट करून दिली आहे. दरम्यान, आता महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला मोठ्या प्रमाणात मराठा समाजाची साथ मिळाली जाईल अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. सध्या राज्यात मराठा आरक्षण आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनात सांभाजीराजे आघाडीवर आहेत यामुळेच आता मराठा समाजाचा पाठिंबा त्यांना मिळू शकतो असे म्हटले जात आहे.
प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू आणि संभाजीराजे एकत्र येतील अशा चर्चा देखील होत आहेत. तसेच राज्यातील अनेक छोटे पक्ष मिळून आघाडी स्थापन करण्याची तयारी सुरू असून हे पक्ष एकत्र येऊन युती तयार झाली तर राज्यातील राजकीय वर्तुळात आघाडीवर असलेल्या महायुती आणि महाविकासआघाडी पक्षासमोर मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.