केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ति पार्टी (रामविलास)चे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. चिराग पासवान यांनी स्पष्ट केले आहे की, जर मला माझ्या समाजाच्या लोकांची कोणतीही समस्या दिसली, ,माझ्या समाजातील लोकांना होत असलेला त्रास दिसला , तर एका मिनिटात मंत्रिपदाचा त्याग करेन असे विधान त्यांनी 30 सप्टेंबर रोजी पटणाच्या एसके मेमोरियल हॉलमध्ये आयोजित अभिनंदन समारंभात केले आहे .
चिराग पासवान यांनी सांगितले आहे की, “मी कोणत्याही गटात असो किंवा कोणत्याही मंत्री पदावर असो, जर मला असे वाटले की संविधान आणि आरक्षणाबद्दल काही अन्याय होतो आहे, तर मी तात्काळ मंत्री पदाला लाथ मारेन.” त्यांनी आपल्या वडिलांची उदाहरण देत सांगितले की, त्यांच्याही वडिलांनी एक मिनिटात मंत्री पदाचा त्याग केला होता, आणि तेही तसाच निर्णय घेऊ शकतात. यावेळी त्यांनी आगामी 28 नोव्हेंबर रोजी गांधी मैदानात मोठ्या रॅलीचे आयोजन करणार असल्याची घोषणा केली आहे.
एसके मेमोरियल हॉलमधील या कार्यक्रमात बोलताना चिराग पासवान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रशंसा केली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी म्हटले आहे की, “पीएम मोदींनी आमच्या बाबतीत योग्य निर्णय घेतला.” त्यांनी क्रीमी लेयरच्या प्रश्नावरही स्पष्ट केले की, तो लागू होणार नाही. तसेच चिराग पासवान यांनी आपल्या समाजाबद्दलची चिंता व्यक्त करताना म्हटले आहे की, “मी सदैव आपल्या समाजासोबत राहीलो आहे आणि राहणार आहे त्यासाठी भलेही मला विरोधाचा सामना का करावा लागेना”
दरम्यान, यावेळी बोलताना चिराग पासवान यांनी त्यांचा चुलत भाऊ पशुपती पारस यांच्यावर देखील टीका केली आहे. ते म्हणाले आहेत की, “काही लोक आहेत जे मला तोडण्याचा प्रयत्न करत आहेत.” चिरागने पुढे सांगितले की, “मी वाघाचा मुलगा आहे. मला कोणत्याही दबावासमोर झुकायचे नाही.” याचसोबत आपल्या वडिलांच्या विचारधारेवर विश्वास ठेवत समाजासाठी लढण्याचा निर्धार देखील चिराग पासवान यांनी व्यक्त केला आहे .