हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या (Vidhansabha Elections 2024 ) प्रचाराच्या काळात जननायक जनता पार्टी (JJP) चे अध्यक्ष दुष्यंत चौटाला (Dushyant Chautala) आणि आजाद समाज पार्टीचे नेते चंद्रशेखर आजाद (Chandrashekhar Azad ) यांच्या गाडीवर 30 सप्टेंबरच्या रात्री हल्ला झाला. या घटनेने राजकारणात मोठी खळबळ उडालेली आहे. दोन्ही नेत्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते या हल्ल्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत.
दुष्यंत चौटाला यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिलेली आहे.ते म्हणालेले आहेत की, “मी पोलिसांना एक तास देत आहे. हल्ला करणाऱ्याला ताब्यात घ्या, फक्त एफआयआर नोंदवण्याचा खेळ चालवू नका.” तसेच यावेळी त्यांनी स्थानिक पोलिसांवर जोरदार टीका केली आहे, कारण हल्ला झाल्यानंतर तातडीने कारवाई व्हावी अशी त्यांची अपेक्षा होती. चंद्रशेखर आजाद यांनीही पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले आहेत, “माझ्यावर हल्ला झाला, तर याची जबाबदारी कोण घेणार?” या घटनेमुळे त्यांच्यातील असंतोष आणि नाराजी स्पष्टपणे दिसून आलेली आहे.
30 सप्टेंबरच्या रात्री दुष्यंत चौटाला आणि चंद्रशेखर आजाद यांचा काफिला उचाना कलान या गावात पोहचला होता. याठिकाणी त्यांनी रोड शो आयोजित केले होते. हल्ला झाल्यानंतर या कार्यक्रमाला तात्काळ थांबविण्यात आले आणि दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांसोबत या घटनेवर चर्चा करण्यास सुरुवात केली. हरियाणा विधानसभा निवडणुकांमध्ये जेजेपी आणि आजाद समाज पार्टी एकत्र येऊन प्रचार करत आहेत. जेजेपी 70 जागांवर तर आजाद समाज पार्टी 20 जागांवर निवडणूक लढवणार आहे. दोन्ही पक्षांचा विधानसभा निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी करण्याचा उद्देश आहे. परंतु या हल्ल्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे.
या हल्ल्यानंतर दुष्यंत चौटाला आणि चंद्रशेखर आजाद यांच्या समर्थकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या प्रकारच्या घटनांनी लोकशाही प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. यामुळे निवडणुकांच्या तयारीवर परिणाम होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. तसेच येथील स्थानिक राजकारणात या घटनेमुळे अधिक तणाव निर्माण होऊ शकतो असे म्हटले जात आहे. दरम्यान, या हल्ल्याच्या मागे नक्की कोण आहे? याचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत.