भारतीय जनता पक्षाचे खासदार अर्जुन सिंह(Arjun Singh) यांच्या पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा घरावर आज सकाळी क्रूड बॉम्ब फेकण्यात आल्याचा प्रकार घडलेला आहे. या हल्ल्यात अर्जुन सिंह हे जखमी झालेले आहेत. अर्जुन सिंह यांच्या घरावर यापूर्वी २०२१ मध्ये दोनदा हल्ला झाला होता. आज सकाळी त्यांच्या घरावर गोळीबाराच्या फायरिंग झालेल्या आहेत. यामुळे आता सगळीकडे मोठी खळबळ उडालेली आहे.
या घटनेवर आता अर्जुन सिंह यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. ते म्हणाले आहेत की, नवरात्रीची पूजा चालू होती आणि मी त्या ठिकाणी होतो. अचानक झालेला स्फोटाचा आवाज ऐकून मी बाहेर आलो. यावेळी माझ्या घरावर 15-20 हल्लेखोरांनी हल्ला केला.गोळ्या झाडल्या गेल्या,आणि माझ्या पायात बॉम्बचा तुकडा (श्रापनल) मारला गेला. माझ्या सुरक्षा रक्षकांवरही हल्ला करण्यात आला. तसेच या अपघातात एक सीआयएसएफ जवानही जखमी झाला असल्याची माहिती अर्जुन सिंह यांनी दिलेली आहे.यामुळे आता परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे घडत असताना पोलिसांनी फक्त बघण्याची भूमिका पार पाडली असा आरोप त्यांनी केलेला आहे.
दरम्यान, या हल्ल्याला तृणमूल काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक सोमनाथ श्याम (Somenath Shyam) यांचा मुलगा नमित सिंग जबाबदार असल्याचे अर्जुन सिंह म्हणाले आहेत. अर्जुन सिंह यांनी नमित सिंग यांच्यावर आरोप करताना म्हटले आहे की, एनआयए प्रकरणातील आरोपी आणि तृणमूल काँग्रेसचे नेते सोमनाथ श्याम यांचा मुलगा नमित सिंग याने अनेक जिहादी आणि गुंडांच्या मदतीने माझ्या कार्यालय आणि मजदूर भवनावर हल्ला केला.’
दरम्यान, आता तृणमूल काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक सोमनाथ श्याम यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत.