कलम 370 हटवल्यानंतर तब्बल 10 वर्षांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) विधानसभा निवडणुका (Vidhansabha Elections 2024) पार पडलेल्या आहेत. यामुळे आता या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे. जम्मू-काश्मीर, हरियाणा येथे विधानसभा निवडणूकीचा उद्या (8 ऑक्टोबर रोजी) निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स आणि कॉंग्रेसने जम्मू काश्मीरमधून एकत्र निवडणूक लढविलेली आहे. तर भाजपाने स्वतंत्र निवडणूक लढविलेली आहे.
5 ऑक्टोबर रोजी हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान घेण्यात आलेले आहे. तर जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या 90 जागांसाठी 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडलेले आहे. उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. पोस्टल मतांची सुरुवातीला मोजणी केली जाईल अशी माहिती मिळालेली आहे.
सरकारी अधिकारी, दिव्यांग, संरक्षण दले आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी पोस्टल बॅलेटने मतदान करत असतात. उद्या सुरुवातीला ह्या पोस्टल बॅलेटची मतमोजणी झाल्यानंतर ईव्हीएमची मतमोजणी करण्यात येणार आहे. जम्मू काश्मीर आणि हरियाणामधील मतदान पार पडल्यानंतर विविध संस्थाचे एक्झिट पोल समोर आलेले आहेत. यामध्ये कोणत्या पक्षाचा विजय होईल आणि राज्यात कोणते सरकार येईल याची देखील माहिती दिलेली आहे. परंतु हे केवळ अंदाज असल्याचे देखील सांगितलेले आहे.
दरम्यान, उद्या (8 ऑक्टोबरला) हरियाणा तसेच जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. यामुळे या निकालात कोणता पक्ष वर्चस्वी ठरणार याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे.