देशभरात एका पाठोपाठ एक अशा अनेक घटना घडत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना गुजरातमध्ये (Gujrat )घडली आहे. गुजरातमधील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र अंबाजी येथे आज (7 ऑक्टोबर रोजी )बसच्या भिषण अपघाताची (Bus Accident )ही दुर्घटना घडलेली आहे. या दुर्घटनेत 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच या अपघातात 5 ते 6 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितलेले आहे. पालनपूर आणि अंबाजी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी या जखमींना दाखल करण्यात आलेले आहे.
हा अपघात गुजरातमधील अंबाजीतील त्रिशूलीया घाटात झाला आहे. या बसमध्ये एकूण 50 प्रवाशी प्रवास करत होते. हे प्रवासी अंबाजी मंदिराचे दर्शन घेऊन दांता शहरात परतत होते. बसचालकाचे अंबाजीतील त्रिशूलीया घाटात बसवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या बसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने या अपघाताबाबत माहिती दिली आहे. या प्रवाशाने सांगितलेले आहे की, घाटावर बसमध्ये चढत असतानाच चालू बसमध्ये बसचालक रील काढत होता. आम्ही सर्वांनी त्याला हे थांबवण्याची विनंती केली पण त्याने कोणाचेच काही ऐकले नाही. यानंतर घाटात रेलिंगला बस धडकली आणि पलटी झाली.
या बसमधील सर्व लोक महुधा तालुक्यातील होते असे सांगण्यात आले आहे. अंबाजी मंदिरात नवरात्रीत कार्यक्रम असतात आणि हे कार्यक्रम पाहण्यासाठीच महुधा तालुक्यातील अनेक लोक त्याठिकाणी येत असतात. त्याचप्रमाणे या वर्षी देखील हे सर्व लोक नवरात्रीच्या कार्यक्रमाला गेले होते परंतू कार्यक्रमावरून परतताना त्यांच्या बसचा अपघात झाला. यामध्ये प्रामुख्याने महिसा गावातील 15 आणि कठालाल गावातील सुमारे 20 जण होते अशी माहिती गावकरी राजेशभाई रोहित यांनी दिलेली आहे.
दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. हा अपघात झाल्यानंतर बसचालक पसार झाला होता. हा बसचालक मद्यधुंद अवस्थेत होता असे देखील काही प्रवाशांनी सांगितलेले आहे. त्यामुळेच त्याला आता पोलिसांनी लवकरात लवकर पकडून त्याला कठोर शिक्षा करावी अशी मागणी लोकांकडून केली जात आहे.