मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू (Mohamed Muizzu)रविवारी (6 ऑक्टोबर रोजी ) पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले आहेत. मागील नोव्हेंबर पासून भारत आणि मालदीवमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. याच पार्श्वभूमीवर मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांचा भारत दौरा अतिशय महत्वपूर्ण मानला जात आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांची भेट घेतलेली आहे. हैदराबाद हाऊसमध्ये या दोघांची बैठक पार पडलेली आहे. मोहम्मद मुइज्जू यांचा राष्ट्रपती झाल्यानंतर हा पहिलाच भारत दौरा आहे असे म्हटले जात आहे.
परराष्ट्र राज्यमंत्री केव्ही सिंग यांनी मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू दिल्लीत आल्यावर त्यांचे स्वागत केले होते. त्यांच्या स्वागताची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल (Randhir Jaiswal) यांनी ट्विट करून दिली होती. या भेटीदरम्यान, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवमधील हनीमाधू आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचे उद्घाटन केले असल्याची माहिती समोर आलेली आहे. दरम्यान याचवेळी मालदीवमध्ये रुपे कार्डद्वारे पेमेंट सुरू करण्यात आले आहे. यामुळेच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्यात अशा प्रकारे पहिला व्यवहार झाला असल्याचे म्हटले जात आहे.
मोहम्मद मुइज्जू राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर भारत-मालदीव संबंध बिघडले होते. त्यामुळे आता भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध सुधारून ते या भेटीनंतर अधिक दृढ होतील अशा चर्चा रंगत आहेत. मोहम्मद मुइझू हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu)यांचीही भेट घेणार आहेत. तसेच यांनातर ते अनेक औद्योगिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी मुंबई आणि बेंगळुरूला भेट देणार असल्याची माहिती देखील मिळालेली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत एक निवेदन जारी केलेले आहे. या निवेदनाच्या माध्यमातून पंतप्रधान म्हणालेले आहेत की, भारत मालदीवचा सर्वात जवळचा शेजारी आणि जवळचा मित्र आहे. तसेच भारत आणि मालदीवमधील संबंध हे शतकानुशतके जुने आहेत. यामुळेच आता आम्ही हिंदी महासागर क्षेत्रात स्थिरता आणि समृद्धीसाठी एकत्र काम करू. याचसोबत कोलंबो येथे संस्थापक सदस्य सिक्युरिटी कॉन्क्लेव्हमध्ये सामील होण्यासाठी मालदीवचे स्वागत आहे असे देखील पंतप्रधानांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलेले आहे.