नुकतीच वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल विजेत्यांची घोषणा करण्यात आलेली आहे. अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर ॲम्ब्रोस (Victor Ambros) आणि गॅरी रुवकून (Gary Ruvkun) यांना मायक्रो आरएनएवरील कार्यासाठी वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात येणार आहे. 7 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर दरम्यान नोबेल पारितोषिक साहित्य आणि शांतता तसेच विज्ञान, अर्थशास्त्र यांसारख्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या लोकांना देण्यात येणार आहे अशी माहिती समोर आली आहे. स्टॉकहोम, स्वीडन याठिकाणी हा कार्यक्रम पार पडणार असल्याचे सांगितलेले आहे. दरवर्षी हा पुरस्कार त्या त्या क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. दरवर्षी दिल्या जाणाऱ्या या परितोषिकाची रक्कम 11 दशलक्ष स्वीडीश क्रोनर म्हणजेच 8.90 कोटी इतकी आहे.
अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकून सूक्ष्म RNA वर केलेल्या या संशोधनांमुळे आपली जीन्स मानवी शरीरात कसे कार्य करतात आणि ते मानवी शरीराच्या विविध ऊतींना कसे जन्म देतात हे स्पष्ट करण्यात मदत झाली असल्याचे शास्त्रज्ञांकडून सांगण्यात येत आहे .यामुळेच स्वीडनच्या कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूटच्या नोबेल असेंब्लीने वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल परितोषिकासाठी या दोघांची निवड केलेली आहे. अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकून यांनी केलेल्या शोधामुळे जनुक नियमनाचे एक नवीन तत्त्व समोर आले आहे. जे मानवासह बहुपेशीय जीवांसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सिद्ध झाले आहे असे अनेक शास्त्रज्ञांनी म्हटलेले आहे.
याचसोबत ॲम्ब्रोस यांना हार्वर्ड विद्यापीठात पुरस्कार मिळाला असून ते सध्या युनिव्हर्सिटी ऑफ मॅसॅच्युसेट्स मेडिकल स्कूलमध्ये नॅचरल सायन्सेसचे प्राध्यापक आहेत. तर रुवकून हे मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटल आणि हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये आनुवंशिकीचे प्राध्यापक आहेत.
दरम्यान, गेल्या वर्षी वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक हंगेरियन-अमेरिकन कॅटालिन कॅरिको आणि अमेरिकन ड्र्यू वेसमन यांना देण्यात आले होते. या दोघांनी कोरोणा काळात mRNA लस तयार करण्यास मदत केली होती. याच्या माध्यमातून त्यांनी कोरोना महामारीचा वेग कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.