आज सकाळपासून हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठीची (Vidhansabha Elections 2024) मतमोजणी चालू झालेली आहे. यामध्ये सुरुवातीला पोस्टल मतांची मतमोजणी करण्यात आलेली आहे. मतमोजणी सुरू होऊन तीन तास झालेले आहेत. सुरुवातीला या मतमोजणीमध्ये कॉँग्रेस आघाडीवर होते परंतु आता भाजपने मतमोजणीत मुसंडी मारलेली आहे.
भाजपने या मतमोजणीमध्ये 48 जागांवर आघाडी घेतली आहे तर काँग्रेस 36 जागांवर आहे. भारतीय लोकलदाचा एक उमेदवार आघाडीवर असून 5 जागांवर अपक्ष आघाडीवर असल्याची माहिती मिळालेली आहे. तसेच या मतमोजणीमध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल विज चौथ्या फेरी अखेर पिछाडीवर असल्याची माहिती मिळालेली आहे. हरियाणातील अंबाला छावणी मतदारसंघातून ते विधानसभा निवडणूक लढवत आहेत.
या मतदार संघात त्यांच्या विरुद्ध परविंदर पाल परी आणि अपक्ष उमेदवार चित्रा सरवरा उभे आहेत. या मतमोजणीमध्ये अपक्ष उमेदवार चित्रा सरवरा आघाडीवर आहेत तर भाजप उमेदवार अनिल विज दुसऱ्या स्थानावर असून तिसऱ्या स्थानावर काँग्रेस उमेदवार परविंदर पाल परी हे आहेत. 64 टक्के मतदान अंबाला छावणी मतदारसंघात झालेले आहे.
दरम्यान, यापूर्वी देखील अनिल विज आणि चित्रा सरवरा यांच्यात 2019 मध्ये चुरशीची लढत झाली होती. त्यावेळी चित्रा सरवरा यांना पराभव पत्करावा लागला होता. अनिल विज हे याठिकाणी सातव्यांदा निवडणूक लढवत आहेत तसेच अनिल विज यापूर्वी सहा वेळा आमदार झालेले आहेत. अशी माहिती मिळालेली आहे.
सध्या भाजप हरियाणात आघाडीवर आहे. त्यामुळे हरियाणामध्ये पुढील काही तासांमध्ये मतमोजणीचे हे कल स्थिर राहिले तर नक्कीच भाजप हरियाणामध्ये तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करेल असे म्हटले जात आहे.