Tamannaah Bhatia : बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटियाची (Tamannaah Bhatia) ईडीकडून (Enforcement Directorate)(अंमलबजावणी संचालनालय) चौकशी करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्रीची चौकशी महादेव बॅटिंग ॲपच्या उपकंपनी ॲप ‘फेअर प्ले’वर आयपीएल सामन्यांची जाहिरात केल्याप्रकरणी होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
या ॲपवर आयपीएल मॅचेस बेकायदेशीरपणे टेलिकास्ट करण्यात आल्याने वायाकॉमला एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणात अभिनेत्रीचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे. म्हणूनच अभिनेत्रीची गुवाहाटी येथील ईडी कार्यालयात सातत्याने चौकशी केली जात आहे. याशिवाय HPZ ॲपबाबतही चौकशी करण्यात येत आहे.
एचपीझेड ( HPZ) ॲपशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने तमन्ना भाटियाची चौकशी केली आहे कारण या ॲपची जाहिरात तमन्ना भाटियाने केली होती. हे HPZ ॲप महादेव बेटिंग ॲपशीही जोडलेले आहे. एचपीझेड ॲप घोटाळ्याप्रकरणी ईडीने तमन्ना भाटियाला चौकशीसाठी बोलावले असून, या प्रकरणात तमन्ना भाटियाची आरोपी म्हणून चौकशी केली जात नाही तर या ॲपच्या प्रचारासंदर्भात चौकशी केली जात आहे.
कोट्यवधी रुपयांचा घोटाळा
या ॲपच्या माध्यमातून 57 हजार रुपये गुंतवल्यानंतर दररोज 4 हजार रुपये देण्याचे आश्वासन देऊन कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. फसवणूक करण्यासाठी, शेल कंपन्यांच्या नावाने वेगवेगळ्या बँकांमध्ये बनावट खाती उघडण्यात आली ज्यात गुंतवणूकदारांकडून पैसे हस्तांतरित केले गेले होते. आरोपींनी हे पैसे क्रिप्टो आणि बिटकॉइन्समध्ये गुंतवले आणि महादेवसारख्या अनेक बेटिंग ॲपवर पैसे गुंतवले आहे. या प्रकरणात, ईडीने आतापर्यंत 497.20 कोटी रुपयांची जंगम (जंगम मालमत्ता म्हणजे अचल मालमत्ता वगळता प्रत्येक वर्णनाची मालमत्ता) मालमत्ता जप्त केली आहे. सध्या अंमलबजावणी संचालनालय या घोटाळ्याच्या तपासात व्यस्त असून, संबंधितांची चौकशी करत आहे.