Maharashtra Assembly Elections : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी आज विरोधी महाविकास आघाडीवर टीका करत ही आघाडी फक्त विनाश करण्यासाठी तयार झाली असल्याचे म्हंटले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान धुळ्यात एका प्रचारसभेत बोलताना अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे. , “महायुती म्हणजे ‘विकास’ आणि आघाडी (महाविकास आघाडी) म्हणजे ‘विनाश’… आता विनाश जे करतात त्यांना सत्तेत आणायचे की नाही हे तुम्ही ठरवायचे आहे.असे आवाहन त्यांनी यावेळी जनतेला केले आहे.
2004 ते 2014 या काळात यूपीएच्या काळात महाराष्ट्राला पुरेसा निधी न दिल्याचा आरोपही त्यांनी काँग्रेसवर केला. ते म्हणाले की ,”या मंचावरून मला राहुलबाबा आणि शरद पवार यांना विचारायचे आहे की, तुम्ही दहा वर्षे केंद्रात असताना महाराष्ट्राला किती पैसे दिलेत ?. त्यांनी 1 लाख 51 हजार कोटी दिले तर मोदीजींनी 2014 ते 2024 या काळात दिले10 लाख 15 हजार आठशे नव्वद.”
एनडीएच्या राजवटीत, देश “समृद्ध आणि सुरक्षित” बनला आहे, भारत जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीत पाचव्या स्थानावर पोहोचला असल्याचे प्रतिपादन यावेळी अमित शाह यांनी केले .
“मोदीजींनी देशाला समृद्ध आणि सुरक्षित बनवले आहे. (माजी पंतप्रधान) मनमोहन सिंग यांच्या काळात भारत जागतिक अर्थव्यवस्थांच्या यादीत अकराव्या क्रमांकावर होता, पण मोदींनी देशाला पाचव्या क्रमांकावर आणले. तसेच 2027 मध्ये भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर असेल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याचवेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर खोटी आश्वासने दिल्याचा आरोप केला ते म्हणाले की, “आघाडीवाले (महाविकास आघाडी) खोटी आश्वासने देतात. नुकतेच काँग्रेस अध्यक्ष खर्गे म्हणाले की, जी आश्वासने पूर्ण करता येतील तीच द्यावीत. कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणामधील काँग्रेस सरकार आपली आश्वासने पूर्ण करू शकली नाही. पण मोदीजींनी दिलेली आश्वासने पूर्ण केली. ‘पत्थर की लेकीर’ आहेत.”
“आम्ही राम मंदिर बांधणार असल्याची घोषणा केली होती आणि तसे केले पण राहुल बाबा किंवा सुप्रिया सुळे दोघांनीही आपल्या मतांच्या गठ्ठयाचा विचार राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला हजेरी लावली नाही… मात्र 550 वर्षांत पहिल्यांदाच राम लल्ला यांनी अयोध्येत दिवाळी साजरी केली. ही आमच्यासाठी अतीव समाधानाची गोष्ट असल्याचे शाह यांनी नमूद केले. तर काँग्रेसने जाणूनबुजून राम मंदिराचा मुद्दा प्रलंबित ठेवला. “अटकाकर, लटकाकर, भटकाकर रखा.” असे ते म्हणाले आहेत.