पुण्यातील न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 2 डिसेंबर रोजी स्वतः हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरील टिप्पणीशी संबंधित आहे. सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात न्यायालयात हा मानहानीचा दावा दाखल केला आहे. विशेष न्यायालयाने राहुल गांधी यांना 18 नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते. मात्र, ते प्रचारात व्यस्त असल्याने न्यायालयात हजर राहू शकले नाहीत, असे त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. त्यानंतर गांधी यांना २ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांनी दिले आहेत त्यानंतर न्यायालयाने ॲड. पवार यांच्याकडून हमीपत्र घेतले आहे की . गांधी हे २ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहतील, असे या हमीपत्रात नमूद करण्यात आले आहे.
सात्यकी सावरकरांचा दावा आहे की राहुल गांधी यांनी मार्च 2023 मध्ये लंडनमधील त्यांच्या भाषणात सांगितले होते की सावरकरांनी एका पुस्तकात लिहिले होते की त्यांनी आणि त्यांच्या पाच-सहा मित्रांनी एकदा एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण केली होती. त्यामुळे त्यांना (सावरकर) आनंद झाला होता. मात्र सावरकरांनी हे कुठेही लिहिलेले नाही, असा दावा याचिकाकर्ते सात्यकी सावरकर यांनी केला आहे
यापूर्वीही राहुल गांधी यांना कोर्टाने समन्स बजावले आहे. सात्यकी सावरकर यांच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधी गेल्या अनेक वर्षांपासून विविध ठिकाणी मुद्दाम वीर सावरकर यांची बदनामी करीत आहेत. ५ मार्च २०२३ मध्ये युकेच्या ओव्हरसीज काँग्रेसच्या एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी जाणूनबुजून सावरकरांविरोधात खोटे आरोप लावले आहेत. ज्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. नुकतच नाशिकच्या एका कोर्टाने राहुल गांधींना एका वेगळ्या मानहानी प्रकरणात समन्स बजावले होते.