प्रसिद्ध अभिनेता विक्रांत मेस्सीने आपल्या अभिनय कारकिर्दीला अलविदा म्हटले आहे. त्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे अभिनय सोडण्याची घोषणा केली आहे. या बातमीने त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. अभिनेता विक्रांत मेस्सीने १ डिसेंबरच्या पहाटे आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये विक्रांत मेस्सीने अभिनयातून निवृत्ती जाहीर केली आहे. अखेर मेस्सीने आपल्या कारकिर्दीत इतका मोठा टप्पा गाठलेला असताना असा निर्णय का घेतला,असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
अभिनेत्याने या पोस्टमध्ये लिहिले की, नमस्ते, मागील काही वर्षे आणि त्यानंतरचा काळ विलक्षण होता. आपल्या अखंड पाठिंब्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. पण जसजसे मी पुढे जात आहे, तसतसे मला जाणवू लागले आहे की आता जरा थांबून पुन्हा मागे वळून बघण्याची आणि घरी परत जाण्याची वेळ आली आहे. एक पती, वडील आणि मुलगा म्हणून आणि अभिनेता म्हणूनही…एक अभिनेता म्हणून मी तुम्हाला 2025 साली शेवटचा भेटणार आहे. माझे शेवटचे २ चित्रपट बाकी आहेत. सर्वांचे आभार, मी सदैव तुमचा ऋणी राहीन.
विक्रांत मेस्सी हा बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने 2007 मध्ये छोट्या पडद्यावरील शो ‘धूम मचाओ धूम’मधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. पण बालिका बधूच्या श्याम सिंगच्या भूमिकेत त्याने प्रेक्षकांची दाद मिळवली होती. विक्रांतने 2013 मध्ये ‘लुटेरा’ चित्रपटातून पदार्पण केले होते. 20 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीच्या या प्रवासात विक्रांत अनेक उत्तमोत्तम सिनेमांमधून प्रेक्षकांच्या समोर आला आहे.12th फेल,छपाक, हसीन दिलरुबा, गॅसलाइट हे काही त्याचे उल्लेखनीय चित्रपट होत.
नुकताच त्याचा ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला,ज्यामध्ये विक्रांतच्या अभिनयाची चांगलीच चर्चा झाली होती. ‘द साबरमती रिपोर्ट’च्या प्रमोशनदरम्यान, अभिनेत्याने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, चित्रपटात सुरू असलेल्या वादामुळे त्याला वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून धमक्या दिल्या जात आहेत. विक्रांतने सांगितले की, या सर्व धमक्यांमध्ये आपल्या मुलाला लक्ष्य केले जात आहे.