अल्लू अर्जुनच्या मागे लागलेला पोलिसांचा फेरा काही संपायचे नाव घेत नाहीये असे दिसत आहे. आज अभिनेता अल्लू अर्जुनला आणखी एक समन्स बजावण्यात आले आहे. 4 डिसेंबर रोजी ‘पुष्पा 2’ चित्रपट रिलीज होत असताना झालेल्या चेंगराचेंगरी दरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला होता आणि तिचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी आता हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनला चौकशीसाठी समन्स बजावले आहे. अभिनेत्याला आज म्हणजेच 24 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले असून तो चौकशीसाठी पोलीस ठाण्यात रवाना झाला आहे.
या प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी 13 डिसेंबर रोजी अल्लू अर्जुनला अटक केली होती.आणि नंतर त्याला हायकोर्टातून अंतरिम जामीन मिळाला होता.अल्लू अर्जुनला अंतरिम जामीन मंजूर करण्यासोबतच न्यायालयाने त्याला या प्रकरणाच्या तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानंतर रविवारी आंदोलकांनी अल्लू अर्जुनच्या घराची तोडफोड केली होती. हे आंदोलक संध्या थिएटरबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत जीव गमावलेल्या महिलेला न्याय देण्याची मागणी करत होते. उस्मानिया विद्यापीठ संयुक्त कृती समितीचे (OU-JAC) सदस्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निदर्शकांनी अल्लू अर्जुनच्या घरावर दगडफेक केली होती.
या सगळ्या प्रकारानंतर अल्लू अर्जुनने चाहत्यांना खास आवाहन केले आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून अल्लू अर्जुनने त्याच्या चाहत्यांना कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका असे आवाहन केले आहे . तसेच त्याने चाहत्यांना सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह वर्तन टाळण्यास सांगितले आहे .
अल्लू अर्जुनचा अंतरिम जामीन रद्द करण्यासाठी पोलीस उच्च न्यायालयात जाण्याचा विचार करत आहेत. याच पार्श्वभूमीवर त्याला समन्स बजावण्यात आले आहे. हैदराबाद पोलीस आयुक्त सी. व्ही. आनंद यांनी रविवारी सांगितले की पोलीस कायदेशीर अभिप्राय घेतल्यानंतर पुढील पावले उचलतील. अल्लू अर्जुनने त्याच्या विरोधातील आरोप फेटाळल्यानंतर पोलिसांनी संध्या थिएटरमधील घटनेचे मिनिटा-मिनिटाचे सीसीटीव्ही फुटेज जारी केले होते.