मिती फिल्म सोसायटी आणि शिक्षण प्रसारक मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २८ आणि २९ डिसेंबर रोजी एस पी महाविद्यालयातील लेडी रमाबाई सभागृहात मिती लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे यंदा चौथे वर्ष असून साऊंड डिझाईनिंग आणि सिनेमॅटोग्राफी या दोन विषयावरील कार्यशाळा हे यावर्षीच्या महोत्सवाचे आकर्षण असणार आहे. प्रामुख्याने पुणे आणि आसपासच्या परिसरातल्या लघुपट निर्मिती क्षेत्रात असणाऱ्या अथवा येऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी हा महोत्सव आयोजित केला जातो.
पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभरातून आणि देशभरातूनही अनेक शॉर्ट फिल्म मेकर्स यासाठी येत असतात. परदेशातूनही अनेक प्रवेशिका महोत्सवासाठी आलेल्या आहेत. आतापर्यंत महोत्सवात कै. विक्रम गोखले, अभिराम भडकमकर, योगेश सोमण, अजय पूरकर, दिक्पाल लांजेकर, मेघराज राजे भोसले, कै. सुहासिनी देशपांडे, प्रसाद नामजोशी यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. हा महोत्सव केवळ स्पर्धा नसून यामध्ये मास्टर क्लास आणि विविध परिसंवाद, चर्चासत्र यांचे आयोजन केले जाते.
चित्रपट दिग्दर्शक मिलिंद लेले मिती फिल्म सोसायटीचे अध्यक्ष असून विख्यात रंगकर्मी आणि चित्रपट अभिनेते चंद्रशेखर कुलकर्णी उपाध्यक्ष आहेत.
यंदाच्या महोत्सवात विविध १४ भाषेतील लघुपट पहावयास मिळणार असून महाराष्ट्र, ओरिसा, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, मध्य प्रदेश, दिल्ली, आंध्र प्रदेश, आसाम, पंजाब तसेच इटली, चीन, अमेरिका, फिनलंड येथून आलेल्या लघुपटांचा यामधे समावेश असणार आहे.
दि २८ डिसेंबर –
सकाळी १०.३० ते ११.३० दरम्यान तू आहेस ना, अडचणीत आलेले लग्न, चाखण्याचा मेनू, कोमल, गहाळ, खरे की खोटे? आणि मंगळसूत्र हे लघु चित्रपट दाखवण्यात येणार असून त्यानंतर साडेअकरा वाजता लघुपट महोत्सवाचे उद्घाटन प्रख्यात मराठी नाटककार आणि चित्रपट दिग्दर्शक हेमंत एदलाबादकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर दु १२ वा वन्यजीव चित्रपट आणि चर्चा विशेष एक क्रमात वन्यजीव चित्रपट निर्माते किरण घाडगे सहभागी होणार आहेत.
दुसऱ्या सत्रात, १ ते ४ या वेळेत सुपर हिरो,
दिवाळीच्या शुभेच्छा, वृंदावन, प्रेमलता एक प्रेमकथा, सीयाच पत्र, मूक अनागोंदी, त्या स्माईलच्या मागे, गोल्डन थेंब, तिसरा – मजला, अलकनंदा, माझा मित्र, सुनो द्रौपदी, त्या दोघी, धरा आणि चव हे लघुपट दाखविण्यात येणार आहेत.
तिसऱ्या सत्रात, साऊंड डिझायनर कमोद खराडे यांची साऊंड डिझाईनिंग या विषयावरील कार्यशाळा दु ४ ते ५ या वेळेत असणार आहे. चौथ्या सत्रात सायं ५ ते ६.३० दरम्यान इनडोअर, द कल्चर, मॅजिक, हाऊ आर यू?, नाचार, निझालिंते निराम(सावलीचा रंग), घाटाळी हे लघुपट दाखविण्यात येतील.
दि २९ डिसेंबर –
२९ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२ वा वंडर स्ट्री, रिक्षा, वी द पीपल, डियर रीवर (प्रिय नदी), शेअर, बेचकी आणि धुन्याआ लघुपट दाखवण्यात येणार असून त्या नंतर दु १२ वा. ए एस कनल यांची चलचित्रनिर्माण (सिनेमॅटोग्राफी) कलेवर ची विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
त्या नंतर दु. १.३० ते ५ दरम्यान जाबू, ओरोन्यो, अनबिरकु एन ओंद्राय अळुथावुम, प्रपोजल, पागल है क्या?, कवाड, हाथेली, माँ तुमी, ट्रीटी ऑफ पिज, ब्लॅक, द ट्री, ओ सि डी, खोपा, थुनई (सोबती), अतुर, पाठी नी पाठी नान (बेटर हाफ), वन बाय टू, कपलिंग, शायेस्त्य हे लघुपट दाखविण्यात येणार असून महोत्सवाचा समारोप प्रसिद्ध अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते पारितोषिक वितरणाने करण्यात येणार आहे. महोत्सवास सर्वांना मुक्त प्रवेश आहे.