बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. या घटनेला 18 दिवस झाले तरी आरोपींना अटक झालेली नसून त्यावरून राज्यभरातील वातावरण अतिशय तापलेले आहे.संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीसह अन्य तीन आरोर्पीना तातडीने अटक करावी, सोबतच सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आज बीड शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता या मोर्च्याला सुरवात होणार आहे.
काळे कपडे व काळ्या फिती लावून मोर्चेकरी या मोर्च्यामध्ये सहभागी होणार आहेत. मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बीड शहरातील चार प्रमुख मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गांनी वळवण्यात आली आहे. तसेच ४०० पेक्षा जास्त पोलीस बंदोबस्त असणार आहे. या मोर्चात हजारोंच्या संख्येने लोक सहभागी होणार असल्याचा अंदाज आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील, संभाजीराजे छत्रपती यांच्यासह आमदार जितेंद्र आव्हाड, विनोद पाटील, खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, सुरेश धस आदी नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत.
याचबरोबर हे नेते संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सरकारच्या दिरंगाईबाबत प्रतिक्रिया देत आहेत. “ठरवले तर पाच मिनिटात यातील मुख्य आरोपी वाल्मिकी कराडला पकडून आणता येईल, पण मंत्र्यांसोबतच्या संबंधांमुळे कराड मोकाट आहे, असा आरोप संभाजीराजे छत्रपतीनी केला आहे. तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या धनंजय मुंडेंना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नसल्याचेही संभाजीराजेंनी म्हटले आहे.