पुणे – मिती फिल्म सोसायटी आणि शिक्षण प्रसार मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ४ थ्या मिती लघुपट महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध नाटककार आणि पटकथा लेखक हेमंत एदलाबादकर यांच्या हस्ते टिळक रस्त्यावरील स प महाविद्यालयातील लेडी रमाबाई सभागृहात करण्यात आले. महाराष्ट्र, ओरिसा, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, मध्य प्रदेश, दिल्ली आंध्र प्रदेश, आसाम, पंजाब यासोबतच इटली, चीन, अमेरिका, फिनलंड इथून आलेल्या विविध १४ भाषेतील १०३ लघुपटांपैकी निवडक ५४ लघुपट या दोन दिवसीय महोत्सवात दाखविण्यात आले. या साठी जेष्ठ चित्रपट अभ्यासक सतिश जकातदार, सिनेमॅटोग्राफर संदीप अवधानी आणि अभिनेत्री पौर्णिमा मनोहर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. महोत्सवात वन्यजीव माहितीपटकार किरण घाडगे, साऊंड डिझायनर कमोद खराडे आणि जेष्ठ सिनेमॅटोग्राफर ए एस कनाल यांनी त्यांच्या क्षेत्रा विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
जेष्ठ अभिनेता मनोज जोशी यांच्या हस्ते पारितोषिक वितरणाने महोत्सवाचा समारोप करण्यात आला. या वेळी उपस्थित तरुणाईला त्यांनी मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले की, “सध्या जग खूप वेगाने पुढे जातंय. रिल्स च्या जमान्यात लोकांना अत्यंत कमी वेळेत होणारे मनोरंजन हवे आहे. अत्याधुनिक मोबाईलचा अति वापर आणि समाज माध्यम त्यामुळे लोकांमध्ये स्थिरता नाही, एकाग्रता कमी झाली आहे अशा वेळी लघुपट हे तुमच्या हातातील प्रभावी शस्त्र आहे ज्याचा वापर तुम्ही कमीत कमी वेळेत प्रबोधनात्मक तसेच सामाजिक हिता साठी, राष्ट्राच्या विकासासाठी करू शकता. सद्य परिस्थिती, निसर्ग, वातावरण अशा कितीतरी विषयांवर चांगले लघुपट बनवू शकता”.
या वेळी मिती फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चित्रपट दिग्दर्शक मिलिंद लेले, उपाध्यक्ष अभिनेते चंद्रशेखर कुलकर्णी, शि प्र मंडळीचे पराग ठाकूर, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, संदीप अवधानी आणि एमएनजीएल चे प्रेम जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अहमद शेख आणि देवदत्त भिंगारकर यांनी केले. या महोत्सवास एमएनजीएल आणि बुलढाणा अर्बन बँकेचे सहकार्य लाभले.
स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे –
सर्वोत्तम लघुपट –
प्रथम – कपलींग
द्वितीय – थूनई
तृतीय – ओसिडी
सर्वोत्तम दिग्दर्शक
अमनदीप सिंग (कपलिंग)
सर्वोत्तम लेखन
विघ्नेश परमसीवम (थूनई)
सर्वोत्तम सिनेमॅटोग्राफर
मोहम्मद रियाल इ ( कवाड)
सर्वोत्तम ध्वनी / संगीत
सुरज नागावकर ( कवाड)
सर्वोत्तम संपादन
आशुतोष भालचंद्र पगारे (ओसीडी)
सर्वोत्तम अभिनेता
आकाश घोसाळकर (कपलिंग)
सर्वोत्तम अभिनेत्री (विभागून)
अनुष्का बोराडे (बेचकी)
मधुरा गोकर्ण (ओसीडी)
सर्वोत्तम बाल कलाकार (विभागून)
साईराज गणेश घोडेचोर (शाहिस्त्या)
प्रसन्नजीत शिंदे (माय डियर रिव्हर)