पवनचक्की प्रकल्पासाठी धमकावून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला व मागील 21 दिवस फरार असलेल्या वाल्मिक कराडला येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने 15 दिवसांची (14 जानेवारीपर्यंत) सीआयडी कोठडी सुनावली आहे .
यावर मंगळवारी (ता. 31) रात्री उशिरापर्यंत सुनावणी चालली. दरम्यान, सरकारी वकिलांनी ऐनवेळी वैयक्तिक कारण देत या प्रकरणातून माघार घेतली. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून आणि पवनचक्की प्रकल्पासाठी दोन कोटी रुपयांची खंडणी मगितल्याचे प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. या दोन प्रकरणासह पवनचक्कीवरील वॉचमनला मारहाण प्रकरणी एट्राॅसिटी व पवनचक्कीवर भांडण असे इतर दोन गुन्हे देखील दाखल आहेत. या चारही प्रकरणांचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे.
दरम्यान, खंडणी प्रकरणात अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यासह संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सुदर्शन घुले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा तत्कालीन केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे आरोपी आहेत. विष्णू चाटे सध्या याच प्रकरणात कोठडीत आहे. दरम्यान, 11 डिसेंबर रोजी दाखल गुन्ह्यानंतर वाल्मिक कराड फरार होता. त्याच्या अटकेसाठी मोठा मोर्चा देखील निघाला. दरम्यान, मंगळवारी सकाळी तो पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात शरण आला. त्यानंतर त्याच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई करून त्याला केजला न्यायालयासमोर हजर करण्यासाठी आणले आहे.
अगोदर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्याला सुनावणीसाठी न्यायालयात आणले. वाल्मिक कराडला केजला आणणार असल्याने त्याच्या समर्थकांनी या परिसरात मोठी गर्दी केली. पोलिसांनी देखील तगडा बंदोबस्त ठेवला होता. न्यायाधीश एस. वाय. पावसकर यांच्यासमोर सुनावणी झाली. सीआयडीचे वकील ऍड. जे. बी. शिंदे यांनी 15 दिवसांची कोठडी मागितली. न्यायाधीश श्री. पावसकर यांनी 15 दिवसांची कोठडी सुनावली. वाल्मिक कराड याच्याकडून ऍड. अशोक कवडे यांनी बाजू मांडली.
वाल्मिक कराडला मंगळवारी रात्री दहा वाजता केज न्यायालयात हजर करण्यात आले. खंडणी आणि हत्या अशा गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यात आरोप झाल्याने कराडच्या अधिक चौकशीसाठी त्याला १५ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकील जे बी शिंदे यांनी केली. तर वाल्मिक कराड हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांच्यावर राजकीय आकसातून आरोप होत आहेत, असा दावा करून सीआयडीला संपूर्ण प्रकरणात सहकार्य करू, आवाजाचे नमुने देऊ, आम्ही स्वत:हून शरण आलो, त्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी मिळावी, असा युक्तिवाद कराडचे वकील अशोक कवडे यांनी केला. त्याचवेळी खंडणीचा गुन्हा दाखल झाला म्हणजे पोलीस कोठडी द्यावा, असे प्रावधान नाही, असा युक्तिवादही कराडचे वकील अशोक कवडे यांनी केला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश एस व्ही पावसकर यांनी वाल्मिक याला उपरोक्त कोठडी सुनावली आहे .