बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येच्या तपासाला वेग आलेला दिसत आहे.आता, राज्य शासनाकडून संतोष देशमुख हत्येप्रकरणी एसआयटी (SIT) स्थापन करण्यात आली आहे. आयपीएस अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्वात ही समिती स्थापन करण्यात आली असून तेली यांच्यासह 10 जणांची ही टीम या घटनेचा सखोल तपास करणार आहे. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या मागचे सत्य लवकर बाहेर येईल अशी शक्यता निर्माण झाली आहे.
संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक करावी यासाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी बुधवारी पाण्यात उतरून आंदोलन केले होते. या प्रकरणात अद्यापही मुख्य ३ आरोपी फरार आहेत . त्यातील सुदर्शन घुले हा महाराष्ट्रातच लपून बसल्याची माहिती आहे तर कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे दोन्ही आरोपी राज्याबाहेर असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. वाल्मिक कराडसाठी हे काम करत असल्याचे म्हटले जात आहे.आता वाल्मिक कराड हा सीआयडीसमोर शरण आला असून त्याच्या चौकशीला सुरवात झाली आहे.
पुणे सीआयडीचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली नऊ अधिकाऱ्यांचा या एसआयटीच्या टीममध्ये समावेश आहे. या टीममध्ये बीड सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर, बीड स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयसिंह जोनवाल, बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, केजचे पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, बीडचे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम जगताप, पोलीस हवालदार मनोज वाघ, केज पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे, पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे आणि पोलीस शिपाई संतोष गीते यांचा समावेश आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान एसआयटीची घोषणा केली होती. बुधवारी, या एसआयटी स्थापनेची गृह विभागाकडून अधिकृत आदेश काढण्यात आले असून आज बसवराज तेली आणि त्यांची टीम बीडमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
कोण आहेत बसवराज तेली
सीआयडी पोलीस उपमहानिरीक्षक आयपीएस अधिकारी बसवराज तेली हे 2010 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते मूळचे बेळगाव जिल्ह्यातील खंदीबुद गावचे आहेत. त्यांनी नागपूर शहर पोलीस उपायुक्त, औरंगाबाद येथे अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे येथे शहर उपायुक्त आणि सांगलीचे पोलीस अधीक्षकपद सांभाळलेले आहे. डॉ. तेली हे एमबीबीएस डॉक्टर आहेत. पोलीस दलातील त्यांच्या सेवेस महाराष्ट्रातील पाचोरा (जि.जळगाव) येथून झाली. सध्या ते पोलीस उपमहानिरीक्षकपदावर कार्यरत आहेत.