इस्कॉन गुरु आणि हिंदू भिक्षू चिन्मय प्रभू उर्फ चिन्मय कृष्ण दास यांचा जामीन अर्ज पुन्हा चितगाव न्यायालयाने फेटाळला आहे. बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अनादर केल्याच्या आरोपाशी संबंधित देशद्रोहाच्या खटल्यात चिन्मय कृष्ण दास यांच्यावर आरोप आहेत . त्यांच्या अटकेमुळे मोठ्या प्रमाणावर बांगलादेशात हिंदुकडून निषेध व्यक्त केला जात आहे. त्यांना देशातील हिंदूंवरील वाढत्या हल्ल्यांविरोधात बोलण्यासाठी अन्यायकारकपणे लक्ष्य केले जात असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला आहे.
या सुनावणीत सुप्रीम कोर्टाचे वकील अपूर्व कुमार भट्टाचार्जी यांच्या नेतृत्वाखाली 11 वकिलांची टीम उपस्थित होती. यावेळी चिन्मय कृष्ण दास यांची बाजू मांडत भट्टाचार्जी म्हणाले की त्यांनी भिक्षूचे रक्षण करण्यासाठी आवश्यक कायदेशीर अधिकार प्राप्त केले आहेत, यापूर्वी उपस्थित केलेल्या प्रक्रियात्मक आक्षेप फेटाळून लावले आहेत.मात्र त्यांच्या प्रयत्नांना न जुमानता न्यायालयाने जामीन नाकारला आणि दास यांची कोठडी वाढवण्यात आली .
यावेळी मुस्लीम वकिलांनी न्यायालयाच्या इमारतीत द्वेषपूर्ण नारेबाजी आणि भारतविरोधी घोषणा दिल्याची माहिती समोर आली आहे. तसेच तुरुंगात बंद असलेले हिंदू धर्मगुरू चिन्मय कृष्ण दास यांचा जामीन अर्ज फेटाळण्याची धमकी न्यायाधीशांना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
चिन्मय कृष्ण दास यांना २५ नोव्हेंबर रोजी ढाका येथील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली होती. तेव्हापासून, त्यांना कोठडीत ठेवण्यात आले आहे, त्यांच्या सुटकेसाठी आंदोलन करत असलेल्या समर्थकांचा असा दावा आहे की हिंदूंवरील अत्याचारांविरुद्ध त्यांचा आवाज बंद करण्याच्या एकमेव उद्देशाने चिन्मय प्रभू यांना खोट्या देशद्रोहाच्या खटल्यात अडकवले जात आहे.
दास यांचे प्राथमिक वकील रवींद्र घोष यांना यापूर्वी अटकपूर्व जामीन याचिका दाखल करण्यापासून रोखण्यात आले होते, ज्यामुळे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे झाले होते. अटकेमुळे त्यांची प्रकृती ढासळत असल्याचा युक्तिवाद दास यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांनी केला आहे. 63 वर्षीय दास यांना मधुमेह आणि श्वासोच्छवासाच्या समस्या आहेत, ज्याचा तुरुंगात त्यांना त्रास होत असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे त्यांच्या समर्थकांना ,अनुयायी आणि मानवाधिकार संघटनांमध्ये चिन्मय प्रभू यांच्या आरोग्याबद्दल चिंता निर्माण झाली आहे.
मात्र कायदेशीर प्रक्रियेतही सतत अनेक अडथळे आले आल्याचे दिसून आले.11 डिसेंबर रोजी, प्रक्रियात्मक त्रुटींमुळे बांगलादेश न्यायालयाने दासची प्रारंभिक जामीन याचिका फेटाळली. त्या सुनावणीत वकिलाची वैध पॉवर ऑफ ॲटर्नी आणि वकिलाची अनुपस्थिती हे नाकारण्याचे कारण म्हणून नमूद करण्यात आले. या अडथळ्यामध्ये भर घालत, त्यांचे एक वकील, सुभाषीष शर्मा यांनी सुरक्षेच्या कारणास्तव 3 डिसेंबरची सुनावणी टाळली . यामुळे खटला आणखी लांबला आणि दास यांचा तुरुंगवास वाढला.