महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट दिली आहे. ज्या कुटुंबांचे उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक हातभार लागावा, या उद्देशाने ही योजना शिंदे फडणवीस सरकारने चालू केली होती. राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती. मात्र काही महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला आहे.
लाडकी बहीण योजनेबाबत 5 प्रकारच्या तक्रारी महिला व बालकल्याण विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे आम्ही या तक्रारीची पडताळणी करणार आहोत. काही तक्रारी या स्थानिक प्रशासनाकडून प्राप्त झाल्या आहे, तर काही लाभार्थी महिलांनी पत्र लिहून योजनेसाठी आता आपण पात्र नसल्याची माहिती दिली आहे. तक्रारी प्राप्त झालेल्या अर्जांची पडताळणी होणार आहे. मात्र मूळ जीआरमध्ये कोणताही बदल होणार नाही असे तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
आता सरसकट कोणत्याही अर्जावर अंमलबजावणी होणार नाही, असे अदिती तटकरे यांनी सांगितले आहे. “उत्पन्नात वाढ झाली असेल, अडीच लाखाच्या वर उत्पन्न गेले असेल तर त्या महिला योजनेसाठी पात्र असणार नाहीत. तसेच चारचाकी असलेल्या महिला अपात्र ठरतील; आंतरराज्य विवाह केलेल्या महिला या योजनेस पात्र नाहीत; तसेच एका महिलेने दोन अर्ज भरले असल्यास तिचेही नाव या योजनेतून बाद होणार आहे. आधार कार्डवरील नाव बँकेतील नावापेक्षा वेगळं असेल आणि ते लक्षात आणून दिल्यास ती संबंधित महिला अपात्र ठरेल”, अश्या नियमांनुसार अर्जांची छाननी केली जाईल त्यानंतर संबंधित महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. असे अदिती तटकरे म्हणाल्या आहेत.
राज्यातील १२ लाख ८७ हजार बहिणींना सहा महिन्यांचे एकूण नऊ हजार बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत चांगलाच फायदा झाला. राज्यातील लाभार्थी बहिणींनी केलेल्या मतदानामुळे महायुतीला घवघवीत यश मिळाल्याचे दिसून आले होते .