बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील मोठी अपडेट पुढे आली आहे. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळे पकडल्याची सूत्रांकडून खात्रीदायक माहिती समोर आली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवीन आरोपी वाढण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात येत आहे.दरम्यान सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळे याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांनाही पुण्यातून ताब्यात घेतले असून त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतरच आरोपींचा ठावठिकाणा सापडला आहे ,अशी माहिती समोर आली आहे. अद्याप पोलिसांनी याबाबतची अधिकृत घोषणा केलेली नसली तरी सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
सरपंच हत्याकांडातील संशयित डॉ.संभाजी वायबसे याला चौकशीसाठी पोलिसांनी काल ताब्यात घेतलं होतं. डॉ. वायबसे हे केज तालुक्यातील कासारीचे असून, त्यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय होता. एसआयटीकडून आरोपींची कसून चौकशी केली जात होती. त्यांनीच दिलेल्या माहितीनंतर आता हे दोन आरोपी सापडले आहेत. आता फक्त कृष्णा आंधळे हा एकच आरोपी फरार आहे. पोलीस त्याच्याही लवकरच मुसक्या आवळतील असे सांगितले जात आहे.
थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेत पोलीस याबाबत सविस्तर माहिती देणार आहेत तसेच आरोपीना आज न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे वृत्तही समोर आले आहे.