राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील मनी ट्रेलबाबत मुंबई गुन्हे शाखेने मोठा खुलासा केला आहे. सिद्दीकी यांच्या हत्येसाठी देशाच्या विविध भागातून निधी उपलब्ध करून देण्यात आले होते. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येसाठी जी १७ लाखांची सुपारी दिली होती, त्याच्यासाठी सर्वाधिक फंडिंग हे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातून झाल्याचे गुन्हे शाखेच्या आरोपपत्रात उघड झाले आहे.
गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,आतापर्यंतच्या तपासादरम्यान फंडिंगबाबत समोर आलेल्या तपासातून सर्वाधिक फंड महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातून देण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित लोकांनी अनमोल बिश्नोई आणि शुभम लोणकर यांच्या सूचनेनुसार कर्नाटक बँकेत उघडलेल्या खात्यात पैसे जमा केल्याचे म्हटले आहे. बाबा सिद्दिकीच्या हत्येसाठी देण्यात आलेल्या सुपारीच्या रकमेपैकी काही पैसे हवालाद्वारे आरोपींपर्यंत पोहोचल्याचेही तपासात समोर आले आहे.
आरोपपत्रानुसार, शुभम लोणकरला गुजरातमधील आणंद येथील कर्नाटक बँकेत आरोपी सलमान वोहराच्या नावाने उघडलेल्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. दरम्यान, उत्तर प्रदेशातील लॉरेन्स बिश्नोई गँगचा स्लीपर सेल वेगवेगळ्या सीडीएम वापरून तिथून अटक केलेल्या आरोपींच्या बँक खात्यात पैसे पाठवत होता.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी देण्यात आलेल्या 17 लाखांच्या सुपारीच्या रकमेपैकी सुमारे 60 ते 70 टक्के रक्कम ही महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांमधून देण्यात आली होती. याशिवाय देशाच्या विविध भागातूनी पैसे पुरवण्यात आल्याचेही आरोपपत्रात नमुद करण्यात आले आहे. मात्र, या ह्त्येत परदेशातून फंड पाठवण्यात आला होता का? याबाबत कोणताही सुगावा तपासात सापडलेला नाही. तर गुन्हे शाखेने कर्नाटक बँक खात्यांमधून महाराष्ट्रातून आलेल्या फंडिंगचा शोध घेतला आहे.परंतु, उत्तर प्रदेशातून आलेल्या फंडिंगच्या मनी ट्रेलचे दुवे जोडण्यात त्यांना यश आलेले नाही.