संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. हे सत्र दोन टप्प्यात पार पडणार आहे. ३१ जानेवारी रोजी राष्ट्रपती दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करतील. लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाने दिलेल्या माहितीनुसार, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला भाग ३१ जानेवारी २०२५ रोजी सुरू होईल आणि १३ फेब्रुवारी रोजी संपेल. तर सत्राचा दुसरा भाग १० मार्च २०२५ रोजी सुरू होईल जो ४ एप्रिल २०२५ रोजी संपेल.
पहिल्याच दिवशी, ३१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करतील. यानंतर आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाईल.तर १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करतील. १८ व्या लोकसभा निवडणुकीनंतर आणि मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळानंतरचा हा पहिलाच सर्वसाधारण अर्थसंकल्प आहे.
याआधी झालेल्या हिवाळी अधिवेशनात मोठा गोंधळ झाला होता. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा कामकाजाचा बराचसा काळ या गोंधळात वाया गेल्याचे दिसून आले होते.
अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, दिल्ली निवडणुकीमुळे ५ फेब्रुवारी रोजी संसदेचे कामकाज बंद राहणार आहे. त्याच वेळी, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा ३ फेब्रुवारीपासून सुरू होईल.राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर दोन्ही सभागृहात चर्चा होते आणि खासदार या चर्चेत भाग घेतात. त्यानंतर पंतप्रधान शेवटी दोन्ही सभागृहात त्यांचे उत्तर देतात. त्यानंतर सत्राचे कामकाज संपते.