अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024 मध्ये सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला होता. यावर्षी त्या सलग 8 वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्री बनणार आहेत. यंदा 31 जानेवारी ते 4 एप्रिल दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी सलग आठवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. परंपरेनुसार, अधिवेशनाची सुरुवात 31 जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करून होईल. त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाईल. अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यात होणार आहे. अधिवेशनात 31 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीत पहिल्या टप्प्यात एकूण 9 बैठका होणार आहेत. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला आणि अर्थमंत्री सीतारामन अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देतील.
यानंतर संसदेला सुट्टी दिली जाईल, जेणेकरून अर्थसंकल्पीय प्रस्तावांचा आढावा घेता येईल. अधिवेशनाचा दुसरा टप्पा 10 मार्चपासून सुरू होणार असून, त्यात विविध मंत्रालयांच्या अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा होऊन अर्थसंकल्पाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. अधिवेशन 4 एप्रिलला संपणार आहे. संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकूण 27 बैठका होणार आहेत.
केंद्रसरकारच्या या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना दिलासा मिळेल असे सांगितले जात आहे. तसेच यावेळी अर्थसंकल्पात आयकर सवलतीची मर्यादा वाढवली जाऊ शकते, असे मानले जात आहे. जे १० लाख रुपयांपर्यंत वाढवले जाऊ शकते. असे झाल्यास करदात्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणाही होऊ शकतात. तसेच केंद्रसरकार डायरेक्ट टॅक्स लॉ साठी नवीन विधेयक मांडू शकते अशीही माहिती समोर येत आहे.