कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MUDA) जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि इतरांची 300 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे.ही कारवाई मनी लाँड्रिंग प्रकरणात करण्यात आल्याचे तपास यंत्रणेने सांगितले आहे. याअंतर्गत या लोकांच्या 142 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.
आता या प्रकरणावर, कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र यांनी प्रतिक्रिया देत या कारवाईला “मोठा विजय” म्हटले आहे. ईडीच्या चौकशीत मुख्यमंत्र्यांशी संबंधित “मोठा भ्रष्टाचार” उघडकीस आल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
यासंदर्भात ट्विटरवर (एक्स) केलेल्या पोस्टमध्ये विजयेंद्र म्हणाले आहेत की, मुदा घोटाळ्याविरुद्धच्या लढाईत आमचा हा मोठा विजय आहे. ईडीच्या तपासात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी संबंधित मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. मुख्यमंत्र्यांवर आपल्या राजकीय प्रभावाचा वापर करून आपल्या पत्नीच्या नावावर बेकायदेशीरपणे जागा वाटप केल्याचा आरोप आहे. राज्यपालांच्या संवैधानिक अधिकारांना कमकुवत केल्याबद्दल त्यांनी काँग्रेसवरही टीका केली. जेव्हा महामहिम राज्यपालांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर खटला चालवण्यास मंजुरी दिली, तेव्हा काँग्रेस पक्षाने राज्यपालांच्या संवैधानिक अधिकाराचा अपमान आणि अवमान करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. असे विजयेंद्र यांनी सांगितले आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयानेही राज्यपालांचा निर्णय कायम ठेवला होता आणि मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबावरील आरोपांची सखोल चौकशी करण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले होते. तसेच विजयेंद्र म्हणाले की, भाजप आणि जेडीएसने मुख्यमंत्री आणि त्यांच्या समर्थकांकडून सत्तेच्या या “दुरुपयोगा” विरोधात विधानसभेच्या आत आणि बाहेर सतत निषेध नोंदवल्याचा हा परिणाम आहे.
ईडीने मुख्यमंत्री सीतारामय्या यांच्यासह इतर जणांची जप्त केलेली मालमत्ता वेगवेगळ्या लोकांच्या नावावर नोंदवण्यात आली आहे अशी माहिती समोर आली आहे. हे लोक रिअल इस्टेट व्यावसायिक आणि एजंट म्हणून काम करत आहेत.वास्तविक, अनेकांना कमी किमतीत अनेक मालमत्ता दिल्याचा मुदावर आरोप आहे. यामध्ये म्हैसूरमधील पॉश भागात सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती यांना दिलेल्या 14 जागांचाही समावेश आहे. म्हैसूरमधील कसाबा होबळी येथील कसारे गावातील त्याच्या 3.16 एकर जमिनीच्या बदल्यात ही जागा देण्यात आली होती. ह्या 14 जागा 3 लाख 24 हजार 700 रुपयांना देण्यात आल्या. मात्र, या 3.16 एकर जमिनीवर पार्वती यांचा कोणताही कायदेशीर हक्क नव्हता. ही जमीन पार्वती यांचा भाऊ मल्लिकार्जुन यांना 2010 मध्ये भेट म्हणून देण्यात आली होती असेही समोर आले होते. तसेच ही जमीन संपादित न करता मुदाने देवनूर स्टेज 3 लेआउट विकसित केला होता.