आज सियालदाह न्यायालयाने कोलकाता मधल्या आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील डॉक्टरवर बलात्कार आणि खून प्रकरणातील दोषी संजय रॉयला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.आज झालेल्या सुनावणीदरम्यान, केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सर्वोच्च न्यायालयाच्या फाशीच्या शिक्षेबाबतच्या मार्गदर्शक तत्वांचा हवाला देत मृत्युदंडाची जोरदार बाजू मांडली होती. सीबीआयने म्हटले आहे की, “असा गुन्हा करणे हा दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा आहे.” या खटल्यात दुर्मिळ शिक्षा दिली जावी जेणेकरून ती प्राधान्यक्रम स्थापित करेल आणि समाजात विश्वास निर्माण करेल,” असा सीबीआयने युक्तिवाद केला होता.
कोलकाता आरजी कर मेडिकल कॉलेज हॉस्पिटल महिला डॉक्टर बलात्कारातून हत्या प्रकरणात आरोपी संजय रॉय याला शनिवारी कोर्टाने दोषी ठरविले होते. यावेळी संजय रॉय याने कोर्टासमोर आपल्याला अडकवले जात असल्याचा दावा केला होता . त्याने जजसमोर आपण दोषी नाही. मला फसवले जात आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नाही असा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता.अखेर विशेष न्यायालयाने आरोपी संजय रॉय याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे..कोलकत्ताचे न्यायाधीश जस्टीस अनिर्बान दास यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
अटकेनंतर जवळजवळ सहा महिन्यांनी, रॉयला विशेष न्यायालयाने बलात्कार आणि हत्येचा दोषी ठरवले आहे, मात्र पीडिता प्रशिक्षणार्थी असलेल्या आरजी कार रुग्णालयातील कनिष्ठ डॉक्टरांनी निकालावर असमाधान व्यक्त केले. त्यांनी अनुत्तरीत प्रश्न आणि इतर संभाव्य संशयितांवर कारवाईचा अभाव यांचा उल्लेख करून या प्रकरणाची अधिक सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे , ज्यामध्ये इतरांचा सहभाग असल्याचा संशय त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.
९ ऑगस्ट २०२४ रोजी कोलकाता येथील सरकारी आर जी कार रुग्णालयात ३१ वर्षीय ज्युनियर डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यांनतर पीडितेचा मृतदेह रुग्णालयाच्या सेमिनार रूममध्ये आढळला होता. . या घटनेमुळे देशभरात संताप व्यक्त झाला आणि पश्चिम बंगालमधील ज्युनियर डॉक्टरांनी सरकारी रुग्णालयांमध्ये न्याय आणि अधिक सुरक्षितता उपाययोजनांची मागणी करत निदर्शने केली होती. या बलात्कार आणि खून प्रकरणातील खटला घटनेच्या तीन महिन्यांनंतर ११ नोव्हेंबर रोजी कोलकाता न्यायालयात सुरू झाला. कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कोलकाता पोलिसांकडून तपास हाती घेतलेल्या केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने रॉयसाठी “जास्तीत जास्त शिक्षा” मागितली होती.
संजय रॉयला सियालदह जिल्हा न्यायालयाने भारतीय न्याय संहितेच्या कलम 64 अंतर्गत बलात्कारासाठी तर कलम 66 आणि कलम 103 (1)अंतर्गत हत्या आणि मृत्यूसाठी दोषी ठरवले आहे. सीबीआयने रॉयवर ठेवलेले सर्व आरोप सिद्ध झाले असून डॉक्टरवर बलात्कार करून तिचा गळा आवळून हत्या केल्याबद्दल रॉय दोषी आढळल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते.