अमेरिकेच्या अलास्का येथून एक विमान अचानक बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे. या विमात असलेले १० जण देखील बेपत्ता आहेत. अलास्कातील उनालाक्लीट शहरातून दुपारी स्थानिक वेळेनुसार २:३७ वाजता उड्डाण केल्यानंतर दुपारी ३:१६ वाजता विमान रडारवरून अचानक गायब झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. हे विमान बेपत्ता झाल्यानंतर संबंधित एजन्सी आता त्याचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘नोमकडे जाणाऱ्या विमानाने गुरुवारी दुपारी स्थानिक वेळेनुसार २:३७ वाजता अलास्काच्या उनालाक्लीट शहरातून उड्डाण केले. त्यानंतर साधारण ३९ मिनिटांनंतर हे विमान रडारवरून अचानक गायब झाले. सेस्ना २०८ बी ग्रँड कॅराव्हॅन विमान गायब झाले आहे. सध्या शोध मोहीम सुरु असून, नोम आणि व्हाइट माउंटनमधील स्थानिकांच्या मदतीने जमिनीवर या विमानाचा शोध सुरु आहे. दरम्यान, खराब हवामान आणि दृश्यमानतेमुळे हवाई शोध थांबवण्यात आला आहे.
अलास्कामध्ये डोंगराळ प्रदेश आणि बदलते हवामान आहे. तसंच येथील अनेक गावे रस्त्यांशी जोडलेली नाहीत, आणि त्यामुळे एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यास इथं चांगल्या सुविधा नाहीत. अशास्थितीत इथं लहान विमानांचा वापर केला जातो.
अलास्कामध्ये इतर कोणत्याही राज्यापेक्षा हवाई अपघात अधिक सामान्य आहेत. अलास्कामध्ये डोंगराळ प्रदेश व कायम धुक्यांचे वातावरण असल्याने सातत्याने अशा घटना इथं घडत असतात.