दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष पिछाडीवर दिसत आहे. आज दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरु आहे. सकाळपासूनच भाजपने अनेक जागांवर आघाडी घेतली आहे. सध्या भाजप 46 जागांवर आघाडीवर आहे, तर आम आदमी पक्ष 24 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसने एका जागेवर आघाडी घेतली आहे. अशातच आता दिल्लीतील निकालांवरून इंडी आघाडीत नवा वाद निर्माण होताना दिसत आहेत.
एकीकडे आप मागे पडताना दिसत आहे तर काँग्रेस शर्यतीत देखील दिसत नाहीये. अशातच जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी यावर प्रतिकिया देत सोशल मीडियावर एक मिम शेअर केलं आहे. या मिम मध्ये महाभारत टीव्ही मालिकेतील एक सीन शेअर केला आहे. यात ओमर अब्दुल्ला यांनी ‘आणखी लढा एकमेकांशी आणि संपवा…’ असं म्हटलंय. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा रोख दिल्लीतील काँग्रेस आणि आप यांच्यावर आहे. दिल्लीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवत आहेत.
ओमर अब्दुल्ला याचं म्हणणं आहे की, युती नसल्यामुळे असा निकाल लागला आहे. अन्यथा भाजपला एकजुटीने आव्हान दिले जाऊ शकले असते. असं त्यांचं मत आहे.
आता ओमर अब्दुल्ला यांच्या वक्तव्यावर काँग्रेसनेही प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सुरेंद्र राजपूत म्हणाले आहेत की, ‘ओमर अब्दुल्ला यांना जे बोलायचे आहे ते बोलावे पण काँग्रेस लढणं सोडणार नाही. हा आपला अधिकार आहे आणि लोकशाहीत प्रत्येकाने निवडणूक लढवली पाहिजे. असं त्यांनी म्हंटल आहे.
खरं तर, निवडणुकांच्या काही दिवस आधी आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात युतीबाबत चर्चा सुरू होत्या. परंतु ही चर्चा पुढे जाऊ शकली नाही आणि दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर इंडी आघाडीत फूट पडल्याचे चित्र होते. यापूर्वी ओमर अब्दुल्ला यांनी इंडी आघाडी बंद करावी असं देखील बोलून दाखवलं होत. अशातच आता लवकरच इंडी आघाडीतील काही पक्ष बाहेर पडतील असंहीबोललं जात आहे. यात काँग्रेसचा देखील समावेश आहे.
विशेष म्हणजे दिल्लीतील 70 पैकी 40 जागांवर भाजप आघाडीवर आहे. या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले आहे. अरविंद केजरीवाल स्वतः नवी दिल्लीतून पिछाडीवर आहेत. तर मनीष सिसोदिया देखील जंगपुरा मतदार संघात मागे आहेत. तसंच दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री अतिशी देखील कालकाजी मतदारसंघातून पिछाडीवर आहेत.