आज दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा दिवस आहे. आज सकाळपासूनच दिल्लीत कोण सत्ता स्थापन करणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून, साकळपासूनच दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष पिछाडीवर दिसत आहे. तर भाजपने अनेक जागांवर आघाडी घेतली आहे.
मिळालेल्या आकडेवारीनुसार, सध्या भाजप 46 जागांवर आघाडीवर आहे, तर आम आदमी पक्ष 24 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसला एकही जागेवर आघाडी मिळवता आलेली नाहीये.
सकाळपासून पिछाडीवर असलेल्या आम आदमी पक्षाला आणखी एक धक्का बसला आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली मतदारसंघातून पराभव झाला आहे. भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांनी त्यांचा पराभव केला आहे.
अरविंद केजरीवाल यांना 10 व्या फेरीपर्यंत एकूण 20190 मते मिळाली होती. तर प्रवेश वर्मा यांना 22034 मते मिळाली होती. प्रवेश वर्मा हे अरविंद केजरीवाल यांच्यापेक्षा 1844 मतांनी आघाडीवर होते. तर तिसऱ्या नंबरवर संदीप दीक्षित आले आहे त्यांना 3503 मते मिळाली आहेत. सुरुवाती पासूनच अरविंद केजरीवाल प्रवेश वर्मा यांच्या मागे होते.