दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (8 फेब्रुवारीला) जाहीर होणार आहे. सकाळी 8 वाजल्या पासूनचं मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सध्या दिल्लीतील 70 जागांपैकी भाजप 48 जागांवर आघाडीवर आहे. तर आम आदमी पक्ष 22 जागांवर आघाडीवर आहे.
अशातच आम आदमी पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांचा पराभव झाला आहे. मनीष सिसोदिया यांचा 600 मतांनी पराभव झाला आहे. तर अरविंद केजरीवाल यांचा जवळपास 1200 मतांनी पराभव झाला.
निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आपचे नेते मनीष सिसोदिया यांनी आपला पराभव स्वीकारला आहे. तसंच त्यांनी भाजप या परिसरातील लोकांच्या कल्याणासाठी काम करेल अशी अशा देखील व्यक्त केली आहे. पुढे त्यांनी विजयी उमेदवाराचे अभिनंदन देखील केले आहे.
मनीष सिसोदिया यांचा पराभव भाजपचे तरविंदर सिंग मारवाह यांनी केला आहे. जंगपुरा विधानसभा मतदारसंघात सिसोदिया आणि मारवाह यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. पण मतमोजणीच्या शेवटच्या फेरीनंतर त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
दरम्यान, आता दिल्लीतील वातावरण पाहता भाजप 27 वर्षांनंतर दिल्लीत सरकार स्थापन करणार असल्याचं चित्र आहे. आज सकाळपासूनच दिल्लीत भाजपने आघाडी घेतली आहे. तर आम आदमी पक्ष पिछाडीवर दिसत आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली विधानसभा निवडणुकीत 60.54 टक्के मतदान झाले आहे. दिल्लीतील 11 जिल्ह्यांमध्ये एकूण 19 मतमोजणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते.