दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. दरम्यान, दिल्लीचे पुढचे मुख्यमंत्री कोण होणार यावर जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच भाजपचा 27 वर्षांचा दुष्काळ सांगणार असल्याचं चित्र दिल्लीत दिसत आहे. भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीत आघाडी घेतल्यानंतर आता एक चर्चा जोरदार रंगली आहे ती म्हणजे दिल्लीत भाजपाचे नेतृत्व कोण करणार?
या शर्यतीत भाजपचे अनेक मोठे नेते आहेत. नुकतीच केजरीवाल यांच्या विरोधात बाजी मारणारे प्रवेश वर्मा यांच्या नावाची दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी चर्चा होत आहे. प्रवेश वर्मा यांनी नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल यांचा मोठ्या मतांच्या फरकाने पराभव केला आहे.
तसेच दिल्लीच्या प्रादेशिक राजकारणातील मोठे नाव असलेल्या मनोज तिवारी यांच्या नावांवरही चर्चा होत आहे. मात्र, आम आदमी पक्ष सोडून भाजपात प्रवेश केलेल्या अनेक नेत्यांची नावेही या यादीत समोर येत आहेत.
मनोज तिवारी आणि प्रवेश वर्मा यांच्या नावाची चर्चा का?
नवी दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात भाजपने प्रवेश वर्मा यांना उमेदवारी दिली होती. ते माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे पुत्र आहेत, ते दोन वेळा खासदार आणि एकदा आमदार राहिले आहेत.
कालकाजी मतदारसंघातून दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना आव्हान देणारे भाजपचे माजी खासदार रमेश बिधुरी यांचे नावही चर्चेत आहे.
दिल्ली भाजपचे माजी अध्यक्ष मनोज तिवारी उत्तर पूर्व दिल्ली मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेले आहेत. भाजपने यावेळी दिल्लीतील सात पैकी सहा जागांसाठी आपले उमेदवार बदलले होते. परंतु मनोज तिवारी यांना तिकीट देण्यात आलं.
पक्षाचे माजी प्रदेश अध्यक्ष सतीश उपाध्याय हे देखील भाजपमधील एक मोठे नाव आहे. त्यांच्या नावाची देखील मुख्यमंत्री पदासाठी चर्चा होत आहे. या यादीत भाजपाचे राष्ट्रीय सचिव आणि माजी आमदार मंजिंदर सिंग सिरसा यांचेही नाव समाविष्ट आहे.
मात्र, या सर्व नावांपैकी प्रत्येकाच्या नजरा केंद्रीय नेतृत्वाकडे आहेत. उत्तर प्रदेश असो, मध्य प्रदेश असो, राजस्थान असो किंवा छत्तीसगड, सर्वत्र भजपने चकित करणारे निर्णय घेतले आहेत. आता दिल्लीतही असाच निर्णय होऊ शकतात.