दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप 27 वर्षांनंतर पुन्हा सत्तेत येणार आहे. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भाजपाला शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या विकासात दिल्ली महत्त्वाची भूमिका बजावेल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. या विजयाबद्दल त्यांनी दिल्लीच्या जनतेचे आभारही मानले आहेत.
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर साईट एक्स वर पोस्ट करत लिहिले आहे की, “जनशक्ति सर्वोपरि! विकास जिंकला, सुशासन जिंकले. भाजपला ऐतिहासिक विजय दिल्याबद्दल दिल्लीतील माझ्या सर्व बंधू-भगिनींना माझे अभिवादन आणि अभिनंदन! तुम्हा सर्वांचे प्रेम आणि समर्थनाबद्दल खूप खूप आभार. दिल्लीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तेथील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही, याची आम्ही हमी देतो. यासह, विकसित भारताच्या उभारणीत दिल्ली महत्त्वाची भूमिका बजावेल याचीही आम्ही खातरजमा करू. या ऐतिहासिक विजयासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या माझ्या सर्व भाजप कार्यकर्त्यांचा मला खूप अभिमान आहे. आता आम्ही आमच्या दिल्लीवासियांच्या सेवेसाठी आणखी दृढपणे समर्पित होऊ.” अशी पोस्ट मोदींनी केली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे आणि आतापर्यंतच्या कलांनुसार भारतीय जनता पक्ष 27 वर्षांनंतर दिल्लीत पुन्हा सत्तेत येत आहे. 70 जागांपैकी भाजप 47 जागांवर आघाडीवर आहे, तर आम आदमी पार्टी 23 जागांवर आघाडीवर आहे. या आकडेवारीवरून हे स्पष्ट आहे की भाजप दिल्लीत पुढील सरकार स्थापन करणार आहे. भाजपने दिल्लीत शेवटची निवडणूक 1993 मध्ये जिंकली होती आणि आता सुमारे 27 वर्षांनंतर भाजप पुन्हा सत्तेत येत आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 5 फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानात एकूण 60.54 टक्के मतदान झाले आहे.