आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांची दिल्ली विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवानंतर पहिली प्रतिकिया समोर आली आहे. विधासभेच्या निकालानंतर केजरीवाल यांनी माध्यमांना संबोधित केले यावेळी ते म्हणाले, ‘आम्ही जनतेचा निर्णय मान्य करतो. तसंच भाजपचे विजयाबद्दल अभिनंदन. आम्ही जनतेच्या कल्याणासाठी काम करत राहू .’ असं त्यांनी म्हंटल आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत केजरीवाल म्हणाले आहेत की, ‘दिल्ली निवडणुकीचे निकाल आले आहेत. जनता जे काही ठरवेल ते आम्ही मान्य करू. हा जनतेचा निर्णय आहे. या विजयाबद्दल मी भाजपचे अभिनंदन करतो. ज्या आशेने लोकांनी त्यांना बहुमत दिले आहे त्या अपेक्षा ते पूर्ण करतील अशी आशा करतो.’
‘गेल्या दहा वर्षांत आम्ही खूप काम केले आहे, शिक्षण, आरोग्य, वीज आणि पाणी या क्षेत्रात खूप काम झाले आहे. आम्ही लोकांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही दिल्लीच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे.
पुढेही आम्ही सत्तेत नसलो तरी दिल्लीच्या लोकांच्या आनंदात आणि दुःखात नेहमीच सोबत राहू. आम्ही राजकारणाला एक माध्यम मानतो ज्याद्वारे आम्ही लोकांची सेवा करू शकतो. आम्ही केवळ मजबूत विरोधी पक्षाची भूमिकाच करणार नाही तर समाजाची सेवा देखील करत राहू.’ असंही केजरीवाल यांनी म्हंटल आहे.
पुढे केजरीवाल म्हणाले आहेत की, ‘मला आम आदमी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करायचे आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. या काळात त्यांना खूप त्रास सहन करावा लागला, परंतु या संपूर्ण निवडणुकीत त्यांनी मोठी भूमिका बजवावी आहे. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.’
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे आणि आतापर्यंतच्या कलांनुसार भारतीय जनता पक्ष 27 वर्षांनंतर दिल्लीत पुन्हा सत्तेत येत आहे. 70 जागांपैकी भाजप 47 जागांवर आघाडीवर आहे, तर आम आदमी पार्टी 23 जागांवर आघाडीवर आहे. या आकडेवारीवरून हे स्पष्ट आहे की भाजप दिल्लीत पुढील सरकार स्थापन करणार आहे. भाजपने दिल्लीत शेवटची निवडणूक 1993 मध्ये जिंकली होती आणि आता सुमारे 27 वर्षांनंतर भाजप पुन्हा सत्तेत येत आहे.