सध्या राज्याचे राजकारण चांगलेच तापल्याचे पहायला मिळतय. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाचे खासदार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात ऑपरेशन टायगरद्वारे सामील होणार असल्याचे बोलले जात आहे. या सगळ्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी तिखट शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘आमचा पक्ष फोडण्याचा कोणी प्रयत्न केला तर आम्ही त्याचे डोके फोडू’ असे ठाकरे म्हणाले आहेत.
तसेच भाजप आणि शिंदे गटाला थेट आव्हान देत ठाकरे म्हणाले की, ‘हिंमत असेल तर ईडी, सीबीआय, आयकर विभाग आणि पोलिसांची मदत घेऊ नका, पुढे या आणि लढा.’ असे खुले चॅलेजच ठाकरेंनी शिवसेना शिंदे गटाला दिले आहे.
उद्धव ठाकरे त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापले जाण्याची शक्यता आहे. सरकारी यंत्रणा न वापरता आपल्या कोणत्याही शिवसैनिकाला पराभूत करता आले तर राजकारण सोडेन, असे उद्धव ठाकरे पुढे म्हणाले आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या डोकं फोडण्याच्या भाषेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. पलटवार करताना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘सिंहाचे कातडे धारण करून सिंह होत नाही, त्यासाठी सिंहाचे हृदय असायचे हवे.” अशा शब्दात शिंदेंनी ठाकरेंवर पलटवार केला आहे. पुढे एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटाचे अनेक नेते आणि खासदार संपर्कात असल्याचा दावा केला आहे.