एन. बीरेन सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर चार दिवसांनी केंद्राने मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घोषणा केली आहे. कालच्या गोंधळादरम्यान, दोन्ही सभागृहांचे कामकाज 10 मार्च रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. त्यानंतर काही तासांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यासंबंधित निर्णय जाहीर केला.
याविषयी घोषणा करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, “मला मणिपूर राज्याच्या राज्यपालांकडून प्राप्त झालेला अहवाल आणि मला मिळालेल्या इतर माहितीचा विचार केल्यानंतर अशी परिस्थिती उद्भवली आहे ज्यामध्ये राज्याचे सरकार भारताच्या नियमांनुसार चालू शकत नाही. त्यामुळे आता मी घोषित करते की, मणिपूर राज्याच्या सरकारची सर्व कार्ये आणि त्या राज्याच्या राज्यपालाने दिलेले किंवा वापरता येणारे सर्व अधिकार स्वीकारत आहे,” असं गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.
मणिपूरमधील भाजपा सरकारचे नेतृत्व करणारे एन. बीरेन सिंग यांनी विरोधकांच्या दबावामुळे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. एन. बीरेन सिंग यांनी 9 फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला होता.
राज्यपालांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अहवाल पाठवल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षाचे प्रभारी संबित पात्रा आणि पक्षाच्या आमदारांमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबत सकारात्मक चर्चा होऊ न शकल्यामुळे भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मणिपूरमध्ये कुकी समुदायाच्या 10 आमदारांनी एन. बीरेन सिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी केली होती. ज्यात दोन मंत्र्यांसह भाजपच्या 7 आमदारांचा समावेश होता. मणिपूरमधील 19 भाजप आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून बीरेन सिंग यांना हटवण्याची मागणी केली होती.
अशातच गेल्या महिन्यापासूनच मणिपूरमध्ये सत्ता बदलाचे संकेत मिळाले होते. बीरेन यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजप लवकरच नवीन मुख्यमंत्र्यांची घोषणा करेल असं चिन्ह होत. पण गेल्या चार दिवसांपासून पक्षाचे आमदार आणि राज्यपाल अजय भल्ला अनेक बैठका झाल्या परंतु नवीन मुख्यमंत्र्याचे नाव निश्चित होऊ शकले नाही. आणि म्हणूनच मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.